लाच मागणाऱ्या तलाठ्याविरोधात गुन्हा
By Admin | Updated: August 9, 2016 01:29 IST2016-08-09T01:28:57+5:302016-08-09T01:29:32+5:30
लाच मागणाऱ्या तलाठ्याविरोधात गुन्हा

लाच मागणाऱ्या तलाठ्याविरोधात गुन्हा
नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मौजे गोरठाण येथे खरेदी केलेल्या शेतजमिनीवर नाव लावून सुधारित सातबारा उतारा देण्यासाठी दोन हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणारे वेळुंजे सजाचे तलाठी मनोज देवीदास मोरे यांच्याविरुद्ध सोमवारी (दि़८) त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला़ तक्रारदाराच्या आजोबाने गोरठाण शिवारात गट नंबर १०९ मधील ७८ आर शेतजमीन खरेदी केली आहे. या जमिनीची महसुली रेकॉर्डला नोंद घेऊन आजोबांच्या नावे सुधारित सातबारा उतारा घेण्यासाठी तक्रारदार तलाठी मोरे यांच्याकडे गेले होते. त्यावेळी मोरे यांनी दोन हजार रुपये लाचेची मागणी केली होती. नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारदाराने तक्रार केल्यानंतर पथकाने २३ मार्च २०१६ रोजी सापळापूर्व पडताळणी केली असता मोरे यांनी लाचेची मागणी केली होती. यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून तक्रारदारास मोरे यांच्याकडे पाठविले असता तुझे काम झालेले आहे. तू सुधारित उतारा घेऊन जा, मी तुला दोन दिवसांनी फोन करतो, तेव्हा तू ये, असे सांगून सातबारा उतारा दिला व तिथून निघून गेले़ दरम्यान, मोरे यांनी लाचेची मागणी केल्याचे पुरावे उपलब्ध झाल्याने मोरेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असे पोलीस अधीक्षक डॉ़ पंजाबराव उगले यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)