निर्बंधांमुळे बाप्पाच्या उत्सवावर विघ्न
By Admin | Updated: August 2, 2015 00:10 IST2015-08-02T00:09:05+5:302015-08-02T00:10:10+5:30
गणेशोत्सव : पोलिसांच्या नियमांमुळे स्थानिक मंडळांची अडचण

निर्बंधांमुळे बाप्पाच्या उत्सवावर विघ्न
संदीप झिरवाळ
पंचवटी
ऐन सिंहस्थ कुंभमेळ्यात गणेशोत्सव आला असून, पोलिसांच्या निर्बंधांमुळे मंडळांची मोठी अडचण झाली आहे. शहरातील अनेक मूर्तिकारांकडे गणेश मंडळांकडून मोठ्या मूर्तींची तसेच देखाव्यांची मागणी न आल्याने मूर्तिकारही काहीसे अडचणीत सापडले आहेत. यंदाच्या वर्षी छोट्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्याची तयारी मंडळांनी दर्शविली आहे.
कुंभमेळ्यात भाविकांची होणारी गर्दी, शाहीमार्ग व मोठे देखावे साकारू नये, असे पोलिसांनी केलेले आवाहन यामुळे सध्या कार्यकर्त्यांच्या उत्साहाला आवर घालावा लागणार आहे. गणेशोत्सवाच्या किमान तीन ते चार महिने अगोदर गणेशमूर्ती, तसेच देखाव्यांची बुकिंग करणारे मंडळाचे कार्यकर्ते यंदा फिरकलेच नसल्याचे मूर्तिकारांकडून सांगण्यात येत आहे. रस्त्यावर मंडप उभारण्यास मनाई, तसेच रस्त्यावर गर्दी होणार नाही, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने मोठे देखावे साकारू नका, असे आवाहन पोलीस प्रशासनाने गणेशोत्सव मंडळांना केले आहे. परिणामी गणेशमूर्ती बनविणाऱ्या मूर्तिकारांकडे यंदा नाशिकसाठी मोठ्या मूर्ती बनविण्याचे कामच नसल्याचे सांगितले जात आहे. अनेक मूर्तिकार सध्या केवळ घरगुती गणेशमूर्ती बनविण्याचे काम करीत आहेत, तर काही मूर्तिकारांकडे मोठ्या मूर्ती बनविण्याचे काम आहे. यंदा सिंहस्थ कुंभमेळ्याच्या १८ सप्टेंबर रोजी होणाऱ्या तिसऱ्या पर्वणीच्या पूर्वसंध्येला दिनांक १७ रोजी गणेशचतुर्थी असल्याने त्यातच मुख्य रस्ते वाहतुकीसाठी बंद असल्याने गणेशमूर्ती मिरवणूक मंडप उभारणी या कामांना अडथळा येणार आहे. मंडळांकडून मोठ्या देखाव्यांची मागणी अद्यापपर्यंत आलेली नसल्याने शहरात दरवर्षी शेकडो देखावे बनविणाऱ्या मूर्तिकारांना सध्या बाहेरगावच्याच मोठ्या मूर्तींचे काम करावे लागत आहे.