अवघा रंग एक झाला... गाणपर्वणी : ‘जयपूर-अत्रौली’ गायकीच्या संगमाने श्रोते मुग्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 01:20 IST2018-03-11T01:20:28+5:302018-03-11T01:20:28+5:30
नाशिक : ‘मारवा’ रागामधील ‘पिया मोरे अनंत देस...’ या बडा ख्यालप्रकारातील बंदिशीपासून सुरू झालेली ‘गाणपर्वणी’ मैफ ल उत्तरोत्तर खुलत गेली.

अवघा रंग एक झाला... गाणपर्वणी : ‘जयपूर-अत्रौली’ गायकीच्या संगमाने श्रोते मुग्ध
नाशिक : ‘मारवा’ रागामधील ‘पिया मोरे अनंत देस...’ या बडा ख्यालप्रकारातील बंदिशीपासून सुरू झालेली ‘गाणपर्वणी’ मैफ ल उत्तरोत्तर खुलत गेली. या मैफलीतून जयपूर-अत्रौली घराण्याच्या गायकीचा आगळा संगम अनुभवत उपस्थित श्रोते पंडित रघुनंदन पणशीकर यांच्या शास्त्रीय गायनात मंत्रमुग्ध झाले. निमित्त होते, गानसरस्वती दिवंगत किशोरीताई अमोणकर यांचा प्रदीर्घ सहवास लाभलेले त्यांचे शिष्य पंडित रघुनंदन पणशीकरांच्या सुमधुर शास्त्रीय गीतगायन मैफलीचे. शंकराचार्य न्यासाच्या सांस्कृतिक विभाग व एन.सी.पी.ए. मुंबई
यांच्या संयुक्त विद्यमाने शंकराचार्य संकुलामध्ये शनिवारी (दि.१०) पार पडलेल्या ‘गाणपर्वणी’ मैफलीचे. जयपूर-अत्रौली गायकीचे साधक असलेले पणशीकर यांनी आपल्या खास शैलीत मारवा रागामधील बंदीश सादर करत मैफलीला प्रारंभ केला. त्यांच्या या बंदिशीने उपस्थित श्रोत्यांची दाद मिळविली. सुरेल-निकोप व तीनही सप्तकांत लीलया फिरणाºया त्यांच्या स्वरांच्या बरसातमध्ये श्रोते चिंब झाले. यावेळी त्यांनी आपल्या गायनातून जयपुरी लयकारीच्या पुढे जात स्वरांना जणू स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाची अनुभूती आपल्या पेशकारीतून उपस्थित श्रोत्यांना दिली. दरम्यान, जयपूर घराण्याच्या गायकीमधील खास मानली जाणारी किशोरीताई अमोणकर यांनी रचलेली यमन रागातील मो मन लगन लगी... ही बंदीश सादर करून पणशीकर यांनी श्रोत्यांची उत्स्फूर्त दाद मिळविली. मैफलीच्या अंतिम टप्प्यात संत सोयराबाई यांची रचना असलेली व किशोरीताई यांनी स्वरबद्ध केलेली भैरवी रागातील ‘अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग..’ या बंदिशीने मैफलीची उंची गाठली. पंडित चंद्रकांत कामत यांचे शिष्य भरत कामत (तबला), पंडित तुळशीदास बोरकर यांचे शिष्य निरंजन लेले (संवादिनी), विनोद कुलकर्णी, नेहा सराफ (तानपुरा) यांनी पणशीकरांच्या गायकीला कौशल्यपूर्ण साथसंगत करत मैफलीत रंग भरला.