उद्दिष्ट पाचशे कोटींचे, उत्पन्न सात कोटी...

By Admin | Updated: September 21, 2015 23:19 IST2015-09-21T23:18:30+5:302015-09-21T23:19:17+5:30

नियोजन फसले : ‘एसटी’चे कुंभपर्व तोट्यात

Objective of 500 crores, generated seven crores ... | उद्दिष्ट पाचशे कोटींचे, उत्पन्न सात कोटी...

उद्दिष्ट पाचशे कोटींचे, उत्पन्न सात कोटी...

नाशिक : ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीद घेऊन नाशिक-त्र्यंबकच्या शाही पर्वण्यांसाठी धावणाऱ्या ‘एस.टी’चा हेतू सफल झाला असला तरी उद्दिष्टपूर्तीच्या बांधापासून महामंडळाला कोसो दूर रहावे लागले. तीनही पर्वण्यांसाठी दाखल झालेल्या भाविकांच्या वाहतुकीद्वारे महामंडळाला सात कोटींचे उत्पन्न प्राप्त होऊ शकल्याने कुंभ पर्व एसटीसाठी तोट्याचे ठरले.
महाकुंभमेळ्याच्या शाहीस्नानाच्या पर्वण्या साधण्यासाठी महामंडळाने जय्यत तयारी केली होती; मात्र अपेक्षेपेक्षा अत्यंत कमी भाविक दाखल झाल्यामुळे एसटी तोट्यात गेली. पर्वणीकाळात एसटी गतिमान असली तरी त्या तुलनेत ग्राहक उपलब्ध नसल्यामुळे एसटीला उद्दिष्टाच्या जवळपासही पोहचता येणे तर दूरच मात्र दुहेरी आकडादेखील गाठता आला नाही. पहिली पर्वणी तर एसटीसाठी कुठल्याही दृष्टीने फलदायी ठरली नाही. याला भाविकांची अत्यल्प संख्या व पोलीस प्रशासनाने शहराभोवती आवळलेला बंदोबस्ताचा फास कारणीभूत असल्याचे बोलले जात होते. पहिल्या पर्वणीला भाविकांच्या वाहतूक करणाऱ्या बहुसंख्य बसेस या रित्या राहिल्या परिणामी महामंडळाच्या तिजोरीतही फारसा फरक पडला नाही.
पहिली पर्वणी महामंडळाला साधता आली नाही; म्हणून महामंडळाच्या पदरी निराशा पडली होती; मात्र तरीही आशावाद कायम ठेवत महामंडळाने दुसऱ्या पर्वणीसाठी विशेष नियोजनाची आखणी केली. एसटीच्या या नियोजनाला साथ लाभली ती पोलीस व जिल्हा प्रशासनाच्या फेरनियोजनाची. यामुळे एसटीजवळ भाविक येऊ शकले आणि दुसऱ्या पर्वणीला एसटीच्या पदरात तीन कोटींचे उत्पन्न पडले. तिसऱ्या अन् अखेरच्या पर्वणीला एसटीला फटका बसला तो पावसाचा. यामुळे एसटीला फारसे उत्पन्न मिळू शकले नाही. कारण तिसऱ्या पर्वणीला भाविकांची संख्या कमीच राहिली.
राजकीय नेत्यांकडून कितीही मोठ्या आकडेवारीचा दावा के ला गेला असला तरी प्रत्यक्षात मात्र त्यांच्या दाव्यानुसार भाविकांची वाहतूक एसटीच्या नशिबी आली नाही. संपूर्ण कुंभपर्व काळामध्ये एसटीला अवघे सात कोटी रुपयांचे उत्पन्न झाल्याची माहिती विभाग नियंत्रक यामिनी जोशी यांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Objective of 500 crores, generated seven crores ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.