नायलॉन मांजाने कापला गळा
By Admin | Updated: January 8, 2016 00:25 IST2016-01-08T00:14:33+5:302016-01-08T00:25:37+5:30
नायलॉन मांजाने कापला गळा

नायलॉन मांजाने कापला गळा
नाशिक : पक्ष्यांसाठी कर्दनकाळ ठरत असलेला नायलॉन मांजा मानवासाठीदेखील घातक ठरत आहे. जुन्या नाशकात एका युवकाचा पतंगाच्या मांजाने गळा कापला गेल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती.
मकर संक्रांतीच्या औचित्यावर तरुणाईला पतंगोत्सवाचे वेध लागले आहेत. अवघ्या आठवडाभरावर येऊन ठेपलेल्या या सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील पतंग, मांजा विक्रीची दुकाने थाटली आहेत. जुने नाशिक, पंचवटी भागात आकाशामध्ये पतंग उडताना दिसू लागल्या आहेत. नायलॉन मांजावर बंदी घातली असतानादेखील काही विक्रेते चोरीछुप्या पद्धतीने नायलॉन मांजाची विक्री करत असून काही तरुणदेखील आकाशात आपली पतंग सुरक्षित रहावी, यासाठी नायलॉन मांजा खरेदी करत वापरताना आढळून येत आहे. परंतु हा नायलॉन मांजा पक्ष्यांबरोबरच मानवासाठी असुरक्षित असून यामुळे दोघा सजीवांचा जीव धोक्यात येत आहे. त्यामुळे नायलॉन मांजाचा वापर पूर्णपणे टाळणे काळाची गरज आहे. नायलॉन मांजारुपी संक्रांत थांबविण्यासाठी तरुणांनी पुढाकार घेत अंमलबजावणी करणे अपेक्षित आहे. सचिन खैरनार हे गणेश वाडीतून दुचाकीवरून जात असताना त्यांच्या मानेला मांजा अडकला व त्यामुळे गळा कापला गेला. या गंभीर अपघातात खैरनार हे सुदैवाने बचावले आहे. (प्रतिनिधी)