नायलॉन मांजाने चिरला दोघांचा गळा
By Admin | Updated: January 6, 2017 00:14 IST2017-01-06T00:14:42+5:302017-01-06T00:14:55+5:30
जिवाला घोर : संक्रांतपूर्व पाच घटना; वाचले दुचाकीस्वारांचे प्राण

नायलॉन मांजाने चिरला दोघांचा गळा
नाशिक : नायलॉन मांजामुळे पक्ष्यांबरोबरच मानवालाही दुखापत होण्याच्या घटना शहरासह उपनगरांमध्ये सातत्याने घडत आहेत. वडाळागाव, अशोकनगर परिसरात दोघा दुचाकीस्वारांचा गळा नायलॉन मांजाने चिरला गेला आहे. संक्रांतपूर्व नायलॉन मांजाने जखमी होण्याच्या पाच घटना आतापर्यंत घडल्या आहेत.
वडाळागावातून रविशंकर मार्गाने गुरुवारी (दि.५) दीपक शंकरसिंग ठाकूर (२४, रा. सिडको) हा युवक दुचाकीने जात असताना नायलॉन मांजा तुटून त्याच्या गळ्यात अडकला आणि दुचाकीपुढे गेल्याने मांजा ओढला जाऊन दीपकचा गळा कापला गेला. सुदैवाने त्याने दुचाकीवरील नियंत्रण सुटू दिले नाही. सदर घटना परिसरातील युवकांच्या लक्षात आल्यानंतर तातडीने ठाकूर यास त्यांनी रुग्णालयात हलविले. गंभीर जखमी झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत होता, असे प्रत्यक्षदर्शी रमीज पठाण यांनी सांगितले. ठाकूर हे एका खासगी रुग्णालयात कामाला असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. दुसरी घटना सातपूरच्या अशोकनगर परिसरात घडली. सातपूरला खरेदीसाठी गेलेले राजेंद्र विश्वकर्मा खरेदी करून दुचाकीने कुटुंबासमवेत घराकडे जात असताना अचानकपणे आलेल्या नायलॉनच्या मांजाचा फास लागल्याने त्यांच्या मानेला गंभीर दुखापत झाली. सदर बाब परिसरातील रहिवाशांच्या लक्षात आल्यानंतर त्यांना जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले. दोन्ही जखमींच्या कुटुंबीयांनी तीव्र संताप व्यक्त करत नायलॉन मांजा लोकांनीच खरेदी करू नये, असे मत व्यक्त केले. (प्रतिनिधी)