सुरत दौऱ्यात महापालिकेचे वस्त्रहरण

By Admin | Updated: November 19, 2015 22:57 IST2015-11-19T22:56:10+5:302015-11-19T22:57:02+5:30

घंटागाडीच्या उद्गात्यांना चपराक : शहर स्वच्छतेने पदाधिकारी प्रभावित, गेडाम पॅटर्नला होणार विरोध

Nupur's footprint in Surat tour | सुरत दौऱ्यात महापालिकेचे वस्त्रहरण

सुरत दौऱ्यात महापालिकेचे वस्त्रहरण

नाशिक : ज्यांनी घंटागाडी प्रकल्पाला जन्माला घातले त्या नाशिक शहरात घंटागाडीची आबाळ होत असताना गुजरातमधील सुरत शहराने मात्र नाशिकचीच संकल्पना स्वीकारत स्वच्छतेचा उत्कृष्ट पॅटर्न विकसित केला. हाच पॅटर्न प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी सुरत दौऱ्यावर गेलेल्या महापालिकेतील पदाधिकारी व अधिकाऱ्यांचे तेथील पद्धत पाहून पुरते वस्त्रहरण झाले. प्रशासनामार्फत दहा वर्षांसाठी सुमारे ३०० कोटींचा घंटागाडीच्या ठेक्याचा गेडाम पॅटर्न शुक्रवारी (दि.२०) होणाऱ्या महासभेत जादा विषयाच्या माध्यमातून चर्चेला येण्याची शक्यता असल्याने सुरत दौऱ्याहून परतलेल्या पदाधिकाऱ्यांकडून त्याला ब्रेक लागण्याची चिन्हे दिसत आहेत. शिवसेनेसह विरोधकांनी सुरत पॅटर्नचे स्वागत करत गेडाम पॅटर्नला पुन्हा एकदा विरोधाचा सूर आवळला असल्याने स्वच्छतेच्या प्रश्नावरून महासभेत घमासान होण्याची शक्यता आहे.
घंटागाडी व शहर स्वच्छतेच्या ठेक्यावरून गेल्या वर्षभरापासून घोळ सुरू आहे. आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर डॉ. प्रवीण गेडाम यांनी घंटागाडीचा ठेका अकरा महिन्यांसाठी न देता तो दीर्घ कालावधीसाठी म्हणजे दहा वर्षांकरिता देण्याचा प्रस्ताव महासभेपुढे ठेवला होता. सुमारे ३०० कोटी रुपयांच्या या ठेक्याला महासभेने विरोध दर्शवित तो केवळ तीन वर्षांपुरताच देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु महासभेच्या निर्णयानंतरही त्याची अंमलबजावणी न करता दहा वर्षांसाठीचाच ठेका कसा योग्य आहे, हे पटवून सांगण्यासाठी पुन्हा एकदा प्रशासनाकडून किरकोळ दुरुस्त्या करत महासभेवर प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवला जाण्याची शक्यता आहे. याशिवाय शुक्रवारी होणाऱ्या महासभेत शहरात साफसफाईची कामे आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून करून घेण्यासाठी सुमारे १२ कोटी खर्चाचाही प्रस्ताव चर्चेला येणार आहे. या दोन्ही प्रस्तावांच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेमार्फत सुरत येथील शहर स्वच्छतेसंबंधीचा दौरा आयोजित करण्यात आला होता. या दौऱ्यात महापौर, उपमहापौरांसह काही पदाधिकारी आणि आरोग्य विभागाचे अधिकारी सहभागी झाले होते. सुरतच्या धर्तीवरच दीर्घ कालावधीसाठी घंटागाडीचा ठेका असल्याचा दावा प्रशासनाने यापूर्वीच केला असल्याने सुरत पॅटर्न पाहून गेडाम पॅटर्नला मान्यता देण्याचा घाट घातल्याची चर्चा आता विरोधकांतून ऐकायला मिळू लागली आहे.

Web Title: Nupur's footprint in Surat tour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.