गिधाडांची संख्या कमी होत आहे - काकुळते
By Admin | Updated: September 12, 2016 01:15 IST2016-09-12T01:14:59+5:302016-09-12T01:15:43+5:30
गिधाडांची संख्या कमी होत आहे - काकुळते

गिधाडांची संख्या कमी होत आहे - काकुळते
देवळाली कॅम्प : गिधाड हा पक्षी निसर्गात सफाई कामगाराची भूमिका बजावणारा पक्षी आहे. गिधाडांची संख्या ही दिवसेंदिवस कमी होत चालली असून नामशेष होण्याची भीती वाढली आहे. असे प्रतिपादन प्राणीशास्त्र विभागाचे प्रा. विक्रम काकुळते यांनी केले.
श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया महाविद्यालयात शनिवारी आंतरराष्ट्रीय गिधाड संरक्षण दिनाबद्दल आयोजित व्याख्यानात बोलताना प्रा. काकुळते म्हणाले की, गिधाड हा मृतभक्षक पक्षी असून तो अन्य प्राण्यांच्या मृतदेहावर जगतो. डोंगर माथ्यावर व उंच मजबूत झाड हे त्याचे राहाण्याचे ठिकाण आहे. भारतात एकेकाळी गिधाडांची संख्या भरपूर होती. मात्र गेल्या काही वर्षात विविध जातीच्या गिधाडांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली असून ती नामशेष होण्याच्या मार्गावर आली आहे. याचा विचार प्रत्येकाने करणे गरजेचे आहे. डायक्लोफॅनिक या वेदनाशामक औषधी द्रव्याचे अंश प्राण्यांमध्ये असल्याचे त्याचा परिणाम गिधाडांवर होत असल्याचे प्रा. काकुळते यांनी सांगितले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. के.एन. गायकवाड, अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा. नानासाहेब पगार, वाणिज्य विभागाच्या प्रा. डॉ. उर्मिला गिते आदि मान्यवर उपस्थित होते.
(वार्ताहर)