संशयित डेंग्यू रुग्णांच्या संख्येने द्विशतक गाठले
By Admin | Updated: November 18, 2014 00:59 IST2014-11-18T00:56:42+5:302014-11-18T00:59:38+5:30
संशयित डेंग्यू रुग्णांच्या संख्येने द्विशतक गाठले

संशयित डेंग्यू रुग्णांच्या संख्येने द्विशतक गाठले
नाशिक : शहरात डेंग्यूचा त्रास वाढतच असून, चालू महिन्याच्या पंधरवाड्यातच तब्बल ८२ रुग्ण आढळले आहे, तर संशयित डेंग्यू रुग्णांच्या संख्येने द्विशतक गाठले आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
शहरात डेंग्यूच्या आजाराने डोके वर काढले. त्यानंतर महापालिकेने ही सर्वसाधारण संख्या असल्याचे सुरुवातीला म्हटले होते. परंतु गेल्या महिन्यांत तब्बल १०० जणांना डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे, तर मनसे नगरसेवक अर्चना जाधव यांचे पती संजय जाधव यांच्यासह किमान पाच ते सहा संशयित डेंग्यू रुग्णांचे बळी गेले आहेत; परंतु महापालिका ते मान्य करायला तयार नाही. पालिकेकडे खासगी वैद्यकीय व्यावसायिक माहिती देत नाहीत, अशी पालिकेची तक्रार होती; परंतु आता खासगी वैद्यकीय व्यावसायिकदेखील पालिकेकडे माहिती पुरवत आहेत. गेल्या पंधरा दिवसांत म्हणजेच १ ते १५ डिसेंबरपर्यंत संशयित डेंग्यू रुग्णांची संख्या २११पर्यंत गेली असून, तितके नमुने शासकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील १७७ रक्तनमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून, ८२ जणांना डेंग्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यातील ७१ रुग्ण पालिका हद्दीतील आहेत, तर ११ रुग्ण बाहेरील असल्याचा दावा पालिकेच्या वैद्यकीय विभागाने केला आहे.
जानेवारीपासून १५ नोव्हेंबरपर्यंत आत्तापर्यंत ६९७ संशयित रुग्णांचे रक्तनमुने जिल्हा रुग्णालयाच्या शासकीय प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी ३१८ रुग्णांना डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
गेल्या महिन्याच्या अखेरीस पावसाळा संपल्याने डेंग्यू रुग्णांची संख्या घटण्याची शक्यता होती; परंतु ही संख्या वाढतच
असल्याने प्रशासनाची आणि नागरिकांची चिंता वाढली आहे. पालिकेने त्वरित दखल घेऊन आवश्यक ती रोगप्रतिबंधक उपाय योजना करावी, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)