ग्रामीण भागात रुग्ण संख्या घटतेय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 22:31 IST2021-05-13T22:28:30+5:302021-05-13T22:31:10+5:30
सटाणा : बागलाण तालुक्यात लॉक डाऊनमुळे रुग्णांची संख्या घटत असल्याचे दिलासा दायक चित्र असले तरी सटाणा शहर मात्र नागरिकांच्या बेफिकिरीमुळे हॉट स्पॉटच्या यादीत कायम आहे.

ग्रामीण भागात रुग्ण संख्या घटतेय
सटाणा : बागलाण तालुक्यात लॉक डाऊनमुळे रुग्णांची संख्या घटत असल्याचे दिलासा दायक चित्र असले तरी सटाणा शहर मात्र नागरिकांच्या बेफिकिरीमुळे हॉट स्पॉटच्या यादीत कायम आहे.
तालुक्यातील सटाणा शहरासह लखमापूर, ब्राम्हणगाव, नामपूर, जायखेडा, ताहाराबाद, मुल्हेर, विरगाव, आराई, सोमपूर या गावांमध्ये कोरोना बाधितांची संख्या वाढल्याने कोरोनाचे हॉट स्पॉट ठरले होते. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून या गावांमध्ये स्थानिक पातळीवर लॉक डाऊनचे कडक नियम लागू केल्याने लखमापूर, ब्राम्हणगाव नामपूर, जायखेडा, ताहाराबाद, सोमपूर या गावांमधील बाधित रुग्णांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे.
मात्र सटाणा शहरासह मुंजवाड, उत्राणे या गावामध्ये बाधित रुग्ण संख्या कमी होण्याचे प्रमाण अल्पच असल्याचे दिसून येते. दरम्यान कोळीपाडा, देवळाने, बहिराणे, सावरपाडा, नवेगाव या गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला असून नियमांचे पालन न केल्यास रुग्ण संख्येत वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
गुरुवारी (दि.१३) ८९ कोरोना बाधित आढळले त्या पैकी ५९ रुग्ण सटाणा शहरातील आहेत. शासनाने डांगसौंदाणे, नामपूर ग्रामीण रुग्णालयात कोविड रुग्णालय सुरु केले असून गेल्या दहा दिवसांपूर्वी ऑक्सीजन बेड फुल असल्याचे चित्र होते.
बेड अभावी अनेक रुग्णांना खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागत होते. गेल्या सहा दिवसांपासून दोन्ही रुग्णालयात दहा पेक्षा अधिक रुग्ण नसल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.