नाशिकमध्ये डेंग्यू रुग्णांची संख्या पावणेचारशेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:17 IST2021-08-15T04:17:51+5:302021-08-15T04:17:51+5:30
नाशिक- गेल्या वर्षी कोरोनामुळे डेंग्यू आणि चिकुनगुनियाचे रुग्ण पुढे आले नाहीत आणि त्याची नाेंदही झाली नाही. मात्र, या ...

नाशिकमध्ये डेंग्यू रुग्णांची संख्या पावणेचारशेवर
नाशिक- गेल्या वर्षी कोरोनामुळे डेंग्यू आणि चिकुनगुनियाचे रुग्ण पुढे आले नाहीत आणि त्याची नाेंदही झाली नाही. मात्र, या दोन्ही आजारांचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळले आहेत. गेल्या महिन्यापर्यंत डेंग्यूचे १८५ रुग्ण सापडले होते. मात्र, ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या १० दिवसांतच शहरात डेंग्यूचे १०६ रुग्ण वाढल्याने डेंग्यू रुग्णांची संख्या पावणेचारशेवर पोहोचली आहे, तर दुसरीकडे चिकुनगुनियाचेही गेल्या दहा दिवसांत ७८ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे महापालिकेची यंत्रणा कामाला लागली आहे.
नाशिक शहरात आता डेंग्यू झालेल्यांची संख्या ३७२ झाली आहे, तर चिकुनगुनियाचेही रुग्ण ३११ झाले आहेत. त्यातच महापालिकेने कितीही दावे केले, तरी खासगी रुग्णालयांमधून पुरेशी आकडेवारी येत नसल्याने डेंग्यू आणि चिकुनगुनियाच्या रुग्णांची संख्या अधिक असण्याची शक्यता आहे.
चालू वर्षी जानेवारी ते मेपर्यंत नाशिक शहरात डेंग्यूचे ४१ रुग्ण आढळले होते. जून महिन्यात डेंग्यूचे ४० रुग्ण वाढले. त्याचवेळी चिकुनगुनियाचेदेखील रुग्ण वाढले. मात्र, त्यापेक्षा डेंग्यू रुग्णांची संख्या वाढत गेली आणि जुलैपर्यंत ही रुग्णांची संख्या ८१ वर पोहोचली. मात्र, जुलै महिन्यातच १८५ नवे रुग्ण आढळले. नाशिक महापालिकेने त्यानंतर धडक मोहीमदेखील हाती घेतली असली, तरी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या दहा दिवसांतच डेंग्यूचे १०६ रुग्ण वाढले असल्याने एकूण संख्या ३७२ वर पोहोचली आहे. चिकुनगुनियाचे जूनपर्यंत शहरात ८५ रुग्ण होते. मात्र, जुलैत १४८ रुग्णांची तर ऑगस्टमध्ये १० दिवसांतच ७८ रुग्ण वाढले आहेत.
इन्फो...
महापालिकेच्या हिवताप विभागाच्या माध्यमातून डास निर्मूलन फवारणी सुरू असताना घरभेटी आणि अन्य उपाययोजनांसाठी तीस पथके तयार करण्यात आली आहेत. मात्र, तरीही या विभागावर येणारा ताण बघता आयुक्तांनी साठ कर्मचारी वर्ग करण्याचे आदेश आरोग्य विभागाला देण्यात आले आहेत.