तथाकथित पर्यावरणवाद्यांकडून उपद्रव
By Admin | Updated: September 7, 2016 00:47 IST2016-09-07T00:46:58+5:302016-09-07T00:47:05+5:30
पुनर्रोपणात व्यत्यय : न्यायालयात जाण्याच्या धमक्या

तथाकथित पर्यावरणवाद्यांकडून उपद्रव
नाशिक : वाढता जनक्षोभ लक्षात घेता गंगापूररोड, पेठरोड आदि ठिकाणी रस्त्यांत अडथळा ठरणाऱ्या वृक्षांच्या पुनर्राेपणाची प्रक्रिया महापालिकेने न्यायालयाच्या निर्देशानुसार सुरू केली असताना तथाकथित पर्यावरणवाद्यांचा उपद्रव वाढल्याने मनपा प्रशासन हैराण झाले आहे. वृक्ष पुनर्राेपणासंबंधी आक्षेप घेत न्यायालयात जाण्याच्या धमक्याही तथाकथित पर्यावरणवाद्यांकडून दिल्या जात असल्याची चर्चा आहे.
गंगापूर रोडवर अडथळा ठरणारे २६ वृक्ष अन्यत्र पुनर्रोपित करण्याची प्रक्रिया महापालिकेने गेल्या शनिवारपासून सुरू केली आहे. आतापर्यंत १३ वृक्षांचे पुनर्रोपण आगरटाकळी परिसरात करण्यात आले आहे, तर उर्वरित वृक्ष पुनर्रोपणाची प्रक्रिया वेगात सुरू आहे. गंगापूर रोडवर मधोमध अडथळा ठरणाऱ्या वृक्षांमुळे अपघाताच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये वृक्ष हटविण्याबाबत आग्रह धरला जात आहे. स्थानिक नगरसेवकांकडूनही त्याबाबत वारंवार महापालिकेत आवाज उठविला जात आहे. दरम्यान, न्यायालयाने काही अटी-शर्तींवर वृक्ष पुनर्रोपणाची व वृक्षतोडीची परवानगी दिल्याने महापालिकेने वाढता जनक्षोभ लक्षात घेता गेल्या शनिवारपासून पुनर्राेपणाची प्रक्रिया हाती घेतली आहे. सदर पुनर्रोपणाची प्रक्रिया ही पुणे विद्यापीठातील वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. मोकाट यांच्या मार्गदर्शनाखाली राबविली जात आहे. त्यासाठी महापालिकेने कालबद्ध कार्यक्रमही आखला आहे. वृक्षपुनर्रोपणाची प्रक्रिया सुरू असतानाच तथाकथित पर्यावरणवाद्यांनी पुन्हा एकदा मनपाच्या या मोहिमेत व्यत्यय आणण्यास सुरुवात केली आहे. वृक्षपुनर्रोपणाची प्रक्रिया नीट राबविली जात नाही, तज्ज्ञ सल्लागार पुनर्रोपणाच्या वेळी जागेवर थांबत नाही आदि आक्षेप घेत मनपा प्रशासनाला तथाकथित पर्यावरणवादी भंडावून सोडत आहे. या वाढत्या उपद्रवाबरोबरच न्यायालयात जाण्याच्याही धमक्या दिल्या जात असल्याची चर्चा आहे. सदर पर्यावरणवाद्यांबाबत स्थानिक नागरिकांमध्येही वाढता रोष असून, नगरसेवक विलास शिंदे यांनी तर संबंंधित पर्यावरणवाद्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. (प्रतिनिधी)