आता आमचा जथ्था निघालाय, भुकेचे बॅनर खांद्यावर घेऊन
By Admin | Updated: September 25, 2016 01:03 IST2016-09-25T01:02:00+5:302016-09-25T01:03:28+5:30
मोर्चा : मराठा समाजाच्या स्थितीचे कवितेतून वर्णन

आता आमचा जथ्था निघालाय, भुकेचे बॅनर खांद्यावर घेऊन
नाशिक : येथील तपोवन पासून निघालेल्या मराठा क्रांती मोर्चामध्ये विविध व्यावसायिकांबरोबरच समाजातील साहित्यिकांनी आपला सहभाग नोंदविला़ केवळ सहभाग नोंदवून हे साहित्यिक थांबले नाहीत तर त्यांनी आपल्या प्रसंगाला साजेशा कवितांद्वारे शेतकरी व मराठा समाजातील वेदनांना वाट मोकळी करून दिली़
आता आमच्या डोक्यात,
पुस्तकं पेटवतायत मशाली
उडीद, कुळीद पेरला वावरात,
तरी क्रांतीचीच उगवतात गाणी
गळून पडताय हातातले टाळ,
मुठी होताय भाले
नासलेल्या रक्ताचे कदाचित,
उद्या वाहतील नदी-नाले
आता आमचा जथ्था निघालाय, भुकेचे बॅनर खांद्यावर घेऊन
दिल्लीच्या तख्ताला आव्हान द्यायला
फास घेऊन मरण्यापेक्षा,
लढता-लढता सरणावर जायला़़़!
- कवी संदीप जगताप यांनी आपल्या भुईभोग या कवितासंग्रहातील ‘जथ्था’ ही प्रसंगानुरूप कविता सादर
केली़
त्यानंतर लासलगाव येथील कवी प्रशांत केंदळे यांनी मराठा समाजातील आर्थिक स्थिती नाजूक असलेल्या गरीब कुणबी शेतकऱ्याची व्यथा मांडली़ त्यामध्ये एकीकडे बापजाद्याची दौलत नाही, तर दुसरीकडे सधनतेचा शिक्का असल्याने आरक्षणही मिळत नाही़ जो कुणबी दिवस-रात्र शेतामध्ये घाम गाळतो, मातीला फुलवतो त्याला न्याय कधी मिळणार असा सवाल त्यांनी पुढील कवितेतून केला़
‘त्याच्या बापजाद्याची नव्हती
अशी काही दौलत
अन् त्याच्या जातीलाही
मिळत नव्हती सवलत
सांगा कधी न्याय मिळेल,
कुणब्याच्या जातीला
ज्याने घाम गाळला,
फुलवलं या मातीला!’
चांदवड येथील कवी विष्णू थोरे यांनी आपल्या कवितेतून शेतकरी आत्महत्त्येवर प्रकाशझोत टाकला़ अन्नदाता शेतकरी हा आत्महत्त्या करू लागलाय तर त्याच्या मरणावर टपलेल्या सरकारी यंत्रणा, सावकार अन् सरकार यासारखे लाखो दलाल इथे तयार झाल्याचे त्यांनी आपल्या कवितेतून सांगितले़
‘कुणी जुंपले हे आत्महत्त्येचे घोडे
आमचेच टांगे उलाल झाले
आमच्या मरणावर टपलेले
लाखो इथे दलाल झाले’
तपोवनापासून लाखोंच्या संख्येने निघालेल्या या मराठा मूक मोर्चात रवींद्र मालुंजकर, राजेंद्र सोमवंशी, सयाजी पगार, राजेंद्र उगले आदी कवीदेखील सहभागी झाले होते़ (प्रतिनिधी)