तीन रेल्वेंमध्ये आता नाशिकचे पाणी भरणार
By Admin | Updated: December 5, 2015 23:52 IST2015-12-05T23:52:08+5:302015-12-05T23:52:51+5:30
मनमाडला टंचाई : पंचवटी, गोदावरी नाशिकरोडला थांबणार

तीन रेल्वेंमध्ये आता नाशिकचे पाणी भरणार
मनोज मालपाणी,नाशिकरोड
मनमाडला पाणीपुरवठा करणाऱ्या पालखेड धरणात पुरेसा पाणी साठा शिल्लक नसल्यामुळे मनमाडहून मुंबईला जाणाऱ्या राज्यराणी, पंचवटी व गोदावरी एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांसाठी पिण्याचे पाणी नाशिकरोड रेल्वेस्थानकातून शुक्रवारपासून भरण्यास सुरुवात करण्यात आली आहे. कुंभमेळ्यात नवीन प्लॅटफॉर्म क्रमांक ४ येथे रेल्वेमध्ये पाणी भरण्याची सोय करण्यात आल्याने त्याचा फायदा झाला आहे.
संपूर्ण महाराष्ट्रासह नाशिक जिल्ह्यातदेखील आतापासूनच पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. कमी प्रमाणात पाऊस झाल्याने सर्वांनाच आतापासून पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. मनमाड परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या पालखेड धरणात पुरेसा पाणी साठा शिल्लक नसल्यामुळे पाणीकपातीचे धोरण सुरू करण्यात आले आहे. त्याचा फटका मनमाड रेल्वे स्थानकालादेखील बसण्यास सुरुवात झाली आहे.
कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकरोड रेल्वेस्थानकात रेल्वे प्रशासनाने प्लॅटफॉर्म ३ व ४ रेल्वे लाइनमध्ये रेल्वेच्या डब्यात पाणी भरण्याची पाइपलाइनची कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण केली आहे. मनमाड रेल्वेस्थानकालादेखील पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत असल्याने रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार शुक्रवारी सकाळपासून मनमाडहून सुटणाऱ्या व मुंबईला जाणाऱ्या राज्यराणी, पंचवटी व गोदावरी एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांकरिता पिण्याचे पाणी नाशिकरोड रेल्वेस्थानकात भरण्यास प्रारंभ झाला आहे. नाशिकचे पिण्याचे पाणी हे रेल्वेमधील प्रवाशांना पिण्याबरोबर व रेल्वेतील शौचालयातदेखील वापरले जाणार आहे.
मनमाड रेल्वेस्थानकावर आतापासूनच पाणीकपात करण्यात आल्याने आणखी पाच-सहा महिने मेपर्यंत नाशिकरोड रेल्वेस्थानकावर राज्यराणी, पंचवटी, गोदावरी एक्स्प्रेसमध्ये पाणी भरले जाणार आहे. आगामी काही दिवसांनंतर पालखेड धरणातून जादा प्रमाणात पाणीकपात करण्यास सुरुवात केली तर रेल्वे प्रशासन आणखी काही रेल्वेंना नाशिकरोड रेल्वेस्थानकातून पाणी भरण्याची व्यवस्था करेल. त्यामुळे नाशिककरांना थोड्या जादा प्रमाणात पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रेल्वे प्रवासी, प्रशासन व नाशिककरांनीदेखील पाणी बचतीची काळजी आतापासूनच गांभीर्याने घेणे गरजेचे आहे.