अबकी बार.. महंगी सरकार!
By Admin | Updated: October 31, 2015 23:03 IST2015-10-31T23:02:23+5:302015-10-31T23:03:02+5:30
काँग्रेसने काढले वाभाडे : शहरभर फिरला महागाई रथ

अबकी बार.. महंगी सरकार!
नाशिक : महागाई आणि भ्रष्टाचाराच्या मुद्यावर निवडून आलेल्या भाजपा सरकारची वर्षपूर्ती वादग्रस्तच ठरली असून, कांद्यापासून तुरडाळीपर्यंत सारेच महाग झाल्याने कॉँग्रेस सेवा दलाच्या वतीने महागाई रथ तयार करण्यात आला ‘अबकी बार, महंगी सरकार’ असे फलक लावलेला रथ शहरभर फिरवून सत्तारूढ भाजपा सरकारचे वाभाडे काढण्यात आले.
राज्यातील भाजपा-शिवसेना सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्ताने हा रथ काढण्यात आला. राज्यात आणि देशात भाजपाची सत्ता आल्यापासून महागाईने उच्चांक गाठला असून, जीवनावश्यक वस्तू खरेदी करणे कठीण झाले आहे. त्यापार्श्वभूमीवर सेवादल अध्यक्ष वसंत ठाकूर यांनी हा रथ तयार केला. कॉँग्रेस भवन येथे सकाळी या रथाचे उद््घाटन माजी मंत्री डॉ. शोभाताई बच्छाव, प्रदेश प्रवक्त्या डॉ. हेमलता पाटील, शहराध्यक्ष शरद अहेर, माजी खासदार प्रतापराव वाघ, प्रदेश सेवादलाचे संघटक आर. आर. पाटील, महिला कॉँग्रेसच्या शहराध्यक्ष वत्सला खैरे, डॉ. ममता पाटील, शाहू खैरे, लक्ष्मण जायभावे, उद्धव निमसे, माजी उपमहापौर गुलाम शेख यांच्यासह अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. उद््घाटनानंतर सदरचा रथ महात्मा गांधी रोड, अशोकस्तंभ, रविवार पेठ, पंचवटी, दिंडोरी रोड, मेरी, म्हसरूळ, निमाणी, औरंगाबाद नाका, जनार्दन स्वामी मठ, दसक पंचक, नाशिकरोड येथून मुंबई नाका येथे आणि तेथून राजीव नगर, राणेनगरमार्गे पाथर्डी फाटा येथे नेण्यात आला. तेथून सिडको आणि सातपूर या विभागात नेऊन सायंकाळी समारोप करण्यात आला.
‘पिपली लाईव्ह’ चित्रपटातील महागाईवरील गाणे यापूर्वी कॉँग्रेसच्या विरोधात भाजपा वाजवित होता, तेच गाणे या रथात लावण्यात आले होते. फलकांवर २०१४-१५ या आर्थिक वर्षातील धान्यांचे भाव तसेच महागाईसंदर्भात वृत्तपत्रातील कात्रणे आणि सरकारवरील व्यंगचित्र लावण्यात आली होती. (प्रतिनिधी)