मनपाकडून पाणीपुरवठ्याचे आता तांत्रिक लेखापरीक्षण
By Admin | Updated: February 6, 2016 23:09 IST2016-02-06T23:02:27+5:302016-02-06T23:09:39+5:30
ग्राहक सर्वेक्षण : नळजोडणी, मीटर तपासणार

मनपाकडून पाणीपुरवठ्याचे आता तांत्रिक लेखापरीक्षण
नाशिक : महापालिकेने शहरात होणारी पाणीपुरवठ्यातील गळती, तसेच चोरी रोखण्यासाठी आता तांत्रिक जल लेखापरीक्षणाचे काम हाती घेतले असून, ग्राहक सर्वेक्षणात नळजोडणी, पाणी मीटर आदिंची तपासणी केली जाणार असल्याची माहिती आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिली आहे. नळजोडणीधारकांनी या शासकीय कामात अडथळा न आणता सहकार्य करण्याचे आवाहनही आयुक्तांनी केले आहे.
गंगापूर धरणातील पाणी मराठवाड्याला पळविण्याची घटना घडल्यानंतर नाशिककरांना प्रथमच पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. सध्या शहरात ९ आॅक्टोबर २०१५ पासून एकवेळ पाणीकपात सुरू आहे. याशिवाय आणखी पाणीकपातीवरून वादही सुरू आहेत. त्यातच पाणीपुरवठ्यातील गळती आणि चोरी रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी लोकप्रतिनिधींकडून सातत्याने प्रशासनाला केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवरच महापालिका प्रशासनाने मागील महिन्यात शहरातील अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सहाय्याने पाणीपुरवठ्याचे एक दिवसाचे सामाजिक अंकेक्षण अर्थात सोशल आॅडिट केले होते. ढोबळ स्वरूपात केलेल्या या सोशल आॅडिटच्या माध्यमातून पाणी वितरणातील असमतोल यासह काही त्रुटी प्रशासनाच्या निदर्शनास आल्या होत्या. आता महापालिकेने पाणीपुरवठ्याचे तांत्रिक जल लेखापरीक्षण करण्याचे काम हाती घेतले असून, त्यासाठी मुंबईच्या एन. जे. एस. इंजिनिअर्स इंडिया प्रा. लिमिटेड या तांत्रिक संस्थेची नेमणूक केली आहे. महापालिकेने या लेखापरीक्षणासाठी संस्थेचे अभियंता व कर्मचारी यांना तात्पुरत्या स्वरूपात ओळखपत्रही दिले आहेत. सदर पथक हे घरोघरी जाऊन ग्राहक सर्वेक्षण करणार असून, तांत्रिक स्वरूपात तपासणी करणार आहेत.