आता स्वाइन फ्लूचाही रुग्ण

By Admin | Updated: July 5, 2014 00:19 IST2014-07-04T23:39:03+5:302014-07-05T00:19:41+5:30

आता स्वाइन फ्लूचाही रुग्ण

Now the swine flu patient | आता स्वाइन फ्लूचाही रुग्ण

आता स्वाइन फ्लूचाही रुग्ण

नाशिक : शहरात पूर्व आणि पंचवटी विभागापाठोपाठ नाशिकरोड विभागातही डेंग्यूचे दोन रुग्ण आढळले आहेत. त्याचप्रमाणे एका महिलेस स्वाइन फ्लू झाल्याचे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पावसाळा सुरू होत नाही तोच विविध रोगांची लागण होण्यास सुरुवात झाल्याने नगरसेवकांनीही पालिका प्रशासनावर संताप व्यक्त केला आहे.
नाशिकरोड येथील जेलरोड भागात ओमनगर येथे राहणाऱ्या सुधाकर वरखेडे (वय ५५) आणि त्यांचा नातू आयुष सचिन वरखेडे (वय ८) या दोघांना डेंग्यू झाल्याचे खासगी प्रयोगशाळेच्या अहवालानुसार घोषित करण्यात आले आहे. दोघेही खासगी रुग्णालयात आठ दिवसांपासून उपचार घेत असून, गुरुवारी सायंकाळी या दोघांना डेंग्यू झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्याचप्रमाणे जेलरोडवर राहणाऱ्या एका महिलेस स्वाइन फ्लू झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. सदर महिलेवर एका खासगी रुग्णालयात स्वतंत्र कक्षात उपचार केले जात आहेत, अशी माहिती या भागाचे शिवसेना नगरसेवक शैलेश ढगे यांनी दिली. यासंदर्भात पालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. सुनील बुकाणे आणि सहायक आरोग्याधिकारी डॉ. सचिन हिरे यांना याबाबत माहिती देण्यात आली आहे. तथापि, पालिकेच्या वतीने कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आलेली नाही. ज्या ओमनगर परिसरात डेंग्यूचे रुग्ण आढळले तेथे कोणत्याही प्रकारे अन्य नागरिकांची तपासणी किंवा डास निर्मूलन पथकामार्फत धुराळणी आणि तत्सम कार्यवाही झाली नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
तीन दिवसांपूर्वी उपमहापौर सतीश कुलकर्णी यांच्या प्रभागात अशोका मार्ग येथे डेंग्यूचे सहा संशयित रुग्ण आढळले. पाठोपाठ पंचवटीतही एक रुग्ण आढळला. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने या दोन्ही विभागांमध्ये डास निर्मूलन मोहीम, पाण्याचे कंटेनर तपासणी आणि डासांची उत्पत्तीस्थाने आढळल्यास ती नष्ट करणे अशा प्रकारची विविध कामे हाती घेतली आहेत. असे असताना डेंग्यूची लागण आता नाशिकरोड विभागापर्यंत पोहोचल्याने नागरिक हवालदिल झाले असून, कार्यवाही करण्याची मागणी करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Now the swine flu patient

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.