नाशिकमध्ये आता पर्यटन विभागाचे प्रादेशिक कार्यालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 00:11 IST2017-10-27T23:46:42+5:302017-10-28T00:11:09+5:30
राज्यात पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्य सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने प्रादेशिक कार्यालये स्थापन करण्याच्या घेतलेल्या निर्णयाचा नाशिकला लाभ झाला असून, लवकरच हे कार्यालय सुरू होणार आहे.

नाशिकमध्ये आता पर्यटन विभागाचे प्रादेशिक कार्यालय
नाशिक : राज्यात पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्य सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने प्रादेशिक कार्यालये स्थापन करण्याच्या घेतलेल्या निर्णयाचा नाशिकला लाभ झाला असून, लवकरच हे कार्यालय सुरू होणार आहे. महाराष्ट्र शासनाने राज्यात पर्यटन संचालनालय व त्याअंतर्गत पाच प्रादेशिक कार्यलये स्थापन करण्याचा निर्णय मार्च २०१६ मध्ये घेतला होता, त्यानुसार उत्तर महाराष्ट्रातदेखील पर्यटन संचालनालयाचे प्रादेशिक कार्यालय असावे म्हणून पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी आग्रही भूमिका घेतली त्यानुसार नाशिकला पर्यटन संचालनालयाच्या प्रादेशिक कार्यालयाला नुकतीच मंजुरी देण्यात आली असून, उत्तर महाराष्ट्राला पर्यटन उपसंचालक हे नवीन पददेखील निर्माण करण्याला राज्य शासनाच्या उच्चाधिकार समितीने मंजुरी दिली आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील पर्यटन वाढीला या निर्णयामुळे मोठी चालना मिळणार आहे. राज्यात पर्यटन संचालनालयाअंतर्गत पाच प्रादेशिक कार्यालये स्थापन करण्यासाठी शासन स्तरावरून हालचाली सुरू झाल्यानंतर त्यात नाशिकचे नाव मागे पडले होते, पंरतु पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी उत्तर महाराष्ट्राला पर्यटन संचालनालयाच्या प्रादेशिक कार्यालयाची गरज असून, उत्तर महाराष्ट्रातील पर्यटन वाढीसाठी आवश्यक असल्याची बाब निदर्शनास आणून दिली याशिवाय राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातदेखील पर्यटन विभागाचे कार्यालय असावे अशी संकल्पना जयकुमार रावल यांनी मांडली होती.
पहिल्या टप्प्यात पर्यटन संचालनालयाच्या प्रादेशिक कार्यालयाला मंजुरी मिळाली असून, याबरोबरच पर्यटन उपसंचालक या पदालादेखील मंजुरी मिळाली आहे, त्यामुळे लवकरच उत्तर महाराष्ट्राचे नाशिकला पर्यटन संचालनालयाचे प्रादेशिक कार्यालय सुरू होणार आहे.