नाशिक : विधानसभा निवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगाकडून करण्यात आल्यानंतर सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. यासोबत शहर पोलीस प्रशासनानेही रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी सोमवारी (दि.२३) पोलीस निरीक्षक ते सहायक आयुक्तांपर्यंत सर्वांची बैठक बोलावून विविध सूचना करत ‘मिशन इलेक्शन’चा नवीन ‘टास्क’ सोपविला.विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचा दिवस जसा जवळ येत जाईल, तसे शहराचे राजकारण अधिक तापू लागेल. या पार्श्वभूमीवर २७ सप्टेंबर ते २४ आॅक्टोबरपर्यंतच्या कायदासुव्यवस्था अबाधित ठेवण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनावर आहे. या पार्श्वभूमीवर नांगरे पाटीलयांनी पोलीस आयुक्तालयात अधिकाऱ्यांची बैठक घेऊन विविध सूचना केल्या.आचारसंहितेत घ्या दक्षताआयुक्त नांगरे पाटील यांनी केलेल्या सूचनांनुसार प्रामुख्याने निवडणूक कालावधीत मतदान, मतमोजणी यासाठी लागणारा बंदोबस्त यास प्राधान्य देण्यात आले आहे. यानंतर आचारसंहिता काळात करावयाच्या कारवाई, प्रतिबंधक कारवाया, नाकाबंदी करणे, गुन्हेगारांचा शोध घेणे, आतापासूनच मतदान बूथच्या इमारतींची पाहणी करून बंदोबस्ताचे नियोजन करणे, प्रचारासाठीच्या सभा,महत्त्वाच्या कार्यक्रमांसाठी सुरक्षा पुरविणे, आदींबाबत नांगरे पाटील यांनी मार्गदर्शन केले.
...आता शहर पोलिसांचे ‘मिशन इलेक्शन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 01:54 IST