आता नाराजांना राजी करा !
By Admin | Updated: February 5, 2017 00:42 IST2017-02-05T00:42:24+5:302017-02-05T00:42:36+5:30
भाजपाचा मेळावा : उद्रेकानंतर भानावर

आता नाराजांना राजी करा !
नाशिक : भाजपाच्या उमेदवारीवरून रणकंदन झाल्यानंतर आता नाराजांच्या नाराजीचा फटका बसू नये यासाठी पक्ष भानावर आला असून, नाराजांच्या घरी जाऊन त्यांची समजूत काढा, असा सल्ला पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिला आहे. तर नाराजांनादेखील पक्ष कुठे ना कुठे संधी देईल, असे शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी स्पष्ट केले. महापालिका निवडणुकीत उमेदवारी डावलल्याने पक्षातील ज्येष्ठ आणि निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. काही ठिकाणी त्याचा उद्रेक झाला आहे. तर अनेक जण नाराजीमुळे तटस्थ झाले आहे. त्यामुळे पक्षाला त्याची किंमत मोजावी लागण्याची शक्यता आहे, हे गृहीत धरून नाराजांना चुचकारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भाजपाने उमेदवारी दिलेल्या १२२ उमेदवारांचा परिचय मेळावा पक्ष कार्यालयात पार पडला. यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन, प्रदेश संघटन मंत्री रवि भुसारी, शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप, आमदार डॉ. अपूर्व हिरे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीची अवस्था केविलवाणी असून, अशावेळी भाजपाला पोषक वातावरण असल्याने त्याचा लाभ घेतला पाहिजे. पक्षातील नाराजांच्या घरी जाऊन त्यांची नाराजी दूर करा आणि प्रचारात त्यांना आपल्या समवेत घ्या, असे सांगताना महाजन यांनी मतदारांशी गोड बोला असा सल्लाही दिला. यावेळी रवि भुसारी, सुनील बागुल, वसंत गिते, लक्ष्मण सावजी, प्रा. सुहास फरांदे आणि विजय साने यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन पवन भगूरकर यांनी केले.