...आता बाप्पाही ‘ओएलएक्स’वर
By Admin | Updated: August 2, 2016 01:39 IST2016-08-02T01:38:51+5:302016-08-02T01:39:23+5:30
नवी शक्कल : विक्रेते, मंडळांकडून होतेय विक्री, खरेदीसाठी प्रतिसाद

...आता बाप्पाही ‘ओएलएक्स’वर
सतीश डोंगरे नाशिक
‘ओएलएक्स पे बेच दे’ असं म्हणत खरेदी-विक्रीचा ट्रेंडच बदलून टाकणाऱ्या ओएलएक्स या संकेतस्थळावर आता चक्क बाप्पाही विक्रीसाठी दाखल झाले आहेत. काही गणेश मंडळांनी जुन्या गणेशमूर्ती विकण्यासाठी ही नवी शक्कल लढविली असून, त्यास खरेदीदारांचाही उत्तम प्रतिसाद लाभत आहे. नाशिक येथील सद्भावना युवक मित्रमंडळाने गेल्यावर्षीची दहा फुटांची गणेशमूर्ती ओएलएक्स या संकेतस्थळावर विक्रीसाठी काढली आहे. संकेतस्थळावर गणेशमूर्तीचा फोटो अपलोड केला असून, २५ हजार रुपये एवढी किंमत आकारली आहे.
विशेष म्हणजे ही जाहिरात अपलोड केल्यानंतर शहरासह इतर जिल्ह्यांतून मूर्ती खरेदीसाठी विचारणा केली जात आहे. याबाबत मंडळाचे सरचिटणीस शैलेश झिटे यांनी सांगितले की, ओएलएक्स हे संकेतस्थळ कुठलाही वस्तू खरेदी-विक्रीसाठी फायदेशीर ठरत आहे. शिवाय येथे मोफत जाहिरात करण्याची सोय असल्यानेच मंडळाने ओएलएक्सवर बाप्पाची जुनी मूर्ती विकण्याचा निर्णय घेतला आहे. जाहिरात अपलोड केल्यापासून आतापर्यंत अनेकांनी मूर्तीबाबत विचारणा केली आहे, तर काहींनी मूर्ती खरेदीत रसही दाखविला आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून खरेदी-विक्रीसाठी ओएलएक्स हे माध्यम प्रभावी ठरत असून, जुन्या टीव्ही, मोबाइल, फर्निचर, मोटारसायकल, चारचाकी, घरे यांसह जणावरंदेखील विकली जात आहेत. विशेष म्हणजे ग्राहकांकडून या वस्तू खरेदींसाठी उत्तम प्रतिसाद लाभत आहे.
त्यातच आता बाप्पाच्या आगमनाचे वेध लागल्याने गणेशमूर्ती विक्रेते व मंडळे ओएलएक्स या संकेतस्थळाचा मूर्ती विक्रीसाठी आधार घेत असल्याने, येत्या काही दिवसांमध्ये ओएलएक्स बाप्पामय होईल की काय असेच चित्र सध्या बघायवास मिळत आहे.