आता शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मनसेचे खळ्ळखट्याक

By Admin | Updated: September 14, 2015 22:52 IST2015-09-14T22:51:25+5:302015-09-14T22:52:41+5:30

राज ठाकरे : शरद जोशींची भेट घेऊन चर्चा करणार

Now the MNS scandal is on the farmers' issue | आता शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मनसेचे खळ्ळखट्याक

आता शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मनसेचे खळ्ळखट्याक

नाशिक : राज्यात दुष्काळाच्या प्रश्नावर राजकीय वातावरण तापू लागले असतानाच मनसेनेही आता या विषयावर उडी घेण्याची तयारी केली आहे. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राजगड येथे शेतकऱ्यांशी चर्चा करून मनसेच्या स्टाइलने खळ्ळखट्याक करण्याचे संकेत दिले आहे. ग्रामीण प्रश्नावर प्रथमच स्वारस्य दाखविणाऱ्या राज यांनी शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही जाहीर केले आहे.
राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सध्या विरोधकांनी सरकारला धारेवर धरले असून, राष्ट्रवादीने जेलभरो आंदोलन सुरू केले आहेत. त्यातून सत्तारूढ आणि विरोधक यांच्यात संघर्ष वाढत असतानाच मनसेनेही आता शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढण्याची तयारी केली आहे. राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये पक्ष कार्यालयात शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित केली होती. यावेळी शेतकऱ्यांनी सध्याच्या दुष्काळापासून ते हमी भाव मिळण्यापर्यंतचे विविध मुद्दे मांडले. चर्चेच्या दरम्यान राज ठाकरे यांनी शेतकऱ्यांनाच अनेक प्रश्न विचारले. शेतकरी हे आंदोलन करताना वेगळ्या भूमिकेत असतात आणि सार्वत्रिक निवडणुकांच्या वेळी दुसऱ्या पक्षीय भूमिकेत असतात, अशी दुटप्पी भूमिका का घेतात, असा प्रश्न त्यांनी उपस्थित प्रतिनिधींना केला. शेतकरी आजवर कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठीशी राहिले, मात्र त्यांना काय मिळाले. शरद पवार हे आता दुष्काळाचे दौरे करीत आहेत, मग इतके वर्ष सत्तेत असताना त्यांनी काय केले, महाराष्ट्रात पंधरा वर्षे सत्ता असताना राष्ट्रवादी आणि कॉँग्रेसने शेतकऱ्यांसाठी सिंचन प्रकल्प किंवा काही अन्य प्रकल्प राबविले असते तर आज दुष्काळाची परिस्थिती उद््भवली नसती, असे सांगून राज यांनी मराठवाड्यातील परिस्थितीबाबत याच पक्षांना जबाबदार ठरविले. एकीकडे मराठवाड्यात पाणी नाही. मग, तेथे बडे राजकीय नेते उसाची शेती करून साखर कारखाने का चालवीत आहेत. इतके वर्षे मते दिलेल्या या राजकीय पक्षाला जाब का विचारत नाहीत, असा प्रश्न करून मराठवाड्याला आत्ताच वाळवंट होण्यापासून रोखले नाही, तर भविष्यात येथील वाळवंट हटविण्यासाठी पावणे दोनशे वर्षे लागतील, असेही ते म्हणाले.
मनसेचे आंदोलन हे निर्णय घेणारे असते, त्यामुळे आधी जे प्रश्न मांडले त्याची उत्तरे तुम्हीच द्या, निर्णय हाती असल्याशिवाय मी आंदोलन करीत नाही असे सांगून त्यांनी पुन्हा २४ सप्टेंबर रोजी नाशिकमध्ये बैठक घेण्यात येईल तोपर्यंत शेतकऱ्यांनी प्रश्नांची उत्तरे शोधून ठेवावीत, असेही सांगितले.
या बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे गोविंद पगार, दीपक पगार, हंसराज वडघुले याचबरोबर मनसेचे रतन कुमार इचम, शेखर पवार, दिनकर जाधव अशा अनेकांनी मते मांडली. सर्वच राजकीय पक्षांकडून भ्रमनिरास झाल्याने आता मनसेकडून अपेक्षा आहेत, मनसेने शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व करावे, ग्रामीण भागापर्यंत पक्ष संघटना बांधावी, नारपार आणि मांजरपाडासारखे प्रश्न सुटावे यासाठी पाणी परिषद घ्यावी, अशा प्रश्नांबरोबरच पालकमंत्री गिरीश महाजन यांना शेतकऱ्यांसाठी वेळ नसल्याच्या तक्रारी केल्या. मनसेचे नेते बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर, महापौर अशोक मुर्तडक, जिल्हाध्यक्ष सुदाम कोंबडे, शहराध्यक्ष राहुल ढिकले, डॉ. प्रदीप पवार यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

स्वाभिमानीही मानणार राज यांचे नेतृत्व

राज्यात सत्तारूढ पक्षाबरोबर असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या स्थानिक पदाधिकऱ्यांनी या बैठकीस हजेरी लावताना राज यांचे नेतृत्व मान्य करण्याची तयारी दर्शविली. इतकेच नव्हे तर स्वाभिमानीचे नेते खासदार राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्याशी चर्चा करून आपण त्यांना राज ठाकरे यांच्या आंदोलनात साथ देण्यासाठी गळ घालण्याची तयारी दर्शवली.

Web Title: Now the MNS scandal is on the farmers' issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.