आता सत्तापदांचे वेध
By Admin | Updated: February 26, 2017 00:21 IST2017-02-26T00:21:03+5:302017-02-26T00:21:17+5:30
कोण होणार महापौर? : महत्त्वाच्या पदांसाठी भाजपात चुरस

आता सत्तापदांचे वेध
नाशिक : महापालिका निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवित घवघवीत यश संपादन करणाऱ्या भाजपातील नवनिर्वाचित नगरसेवकांना आता सत्तापदांचे वेध लागले आहेत. १५ मार्चपूर्वी महापौर विराजमान होणे आवश्यक असल्याने भाजपातील पाच इच्छुकांपैकी पक्षश्रेष्ठी कुणाच्या पदरात महापौरपद टाकतात, याची उत्सुकता वाढली आहे. दरम्यान, उपमहापौरांसह स्थायी समिती, शिक्षण समिती या महत्त्वाच्या पदांसाठी पक्षात चुरस दिसून येत आहे. महापालिकेत भाजपाने ६६ जागा संपादन करत पूर्ण बहुमत प्राप्त केले, तर ३५ जागा जिंकणाऱ्या शिवसेनेला आता प्रमुख विरोधी पक्षाची भूमिका निभवावी लागणार आहे. नवनिर्वाचित नगरसेवकांची नोंद अधिकृतपणे राजपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर १५ मार्चपूर्वी महापौरपदाची निवडणूक घ्यावी लागणार आहे. पुढील अडीच वर्षांसाठी महापौरपद हे अनुसूचित जमातीसाठी आरक्षित असून, भाजपाकडून या गटात ज्येष्ठ नगरसेवक रंजना भानसी, पुंडलिक खोडे, सुरेश खेताडे, प्रा. सरिता सोनवणे व रूपाली निकुळे हे पाच नगरसेवक निवडून आले आहेत. यामध्ये सलग पाचव्यांदा निवडून आलेल्या रंजना भानसी या प्रबळ दावेदार आहेत. पुंडलिक खोडे यांनी यापूर्वी नगरसेवकपद भूषविले असले तरी काहीकाळ ते सक्रिय नव्हते, तर सुरेश खेताडे यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन निवडणुकीपूर्वी भाजपात प्रवेश केलेला आहे. रूपाली निकुळे यांनीही निवडणुकीच्या तोंडावर भाजपात प्रवेश केला आहे. सरिता सोनवणे या पहिल्यांदाच महापालिकेत निवडून गेल्या आहेत. त्यामुळे महापौरपदाच्या खुर्चीसाठी रंजना भानसी यांची निवड निश्चित मानली जात आहे.