आता ग्राहकांबरोबरच शेतकरी हिताचाही विचार

By Admin | Updated: February 13, 2016 00:02 IST2016-02-13T00:01:47+5:302016-02-13T00:02:01+5:30

केंद्रीय पथकाची भूमिका : आले वाढीचा अंदाज घ्यायला; पण भाव होते कोसळलेले

Now the idea of ​​farmers' interests is also with the customer | आता ग्राहकांबरोबरच शेतकरी हिताचाही विचार

आता ग्राहकांबरोबरच शेतकरी हिताचाही विचार

 नाशिक : पाऊस कमी झाला म्हणून कांद्याचे दर वाढण्याची धास्ती बाळगून नाशिकमध्ये पाहणीसाठी आलेल्या केंद्राच्या ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना येथे मात्र भाव कोसळल्याने धक्का बसला. शेतकऱ्यांना आणि ग्राहकांना मिळणाऱ्या दरातील तफावत ही केवळ मध्यस्थांच्या साखळीमुळे निर्माण होत असते. त्यामुळे त्यावर योग्य ती दखल घेण्याची सूचना केंद्रशासनाला करण्यात येईल, असे या अधिकाऱ्यांनी सांगितले.
गेल्यावर्षी देशभरात पुरेसा पाऊस झालेला नाही, त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्णातील लासलगावसह विविध ठिकाणी जाऊन आढावा घेण्यासाठी केंद्रशासनाच्या ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे संचालक मो. झाकीर हुसेन आणि सहायक संचालक दिनेश कुमार नाशिकच्या दौऱ्यावर आले होते. ग्रामीण भागात शेतकरी आणि बाजार समितीशी चर्चा केल्यानंतर पथकाच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत माहितीची देवाण-घेवाण केली. त्याचबरोबर पत्रकारांशी वार्तालापही केला. कांद्याचे दर वाढले तर ग्राहकांना अडचण होते हे खरे असले तरी केवळ ग्राहकहिताचाच विचार सरकार करत नाही, शेतकऱ्यांचाही विचार करावा लागणार आहे. कारण शेतकऱ्यांनी माल पिकवला नाही तर काय अवस्था होईल याचा विचार करणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. ग्राहकांना जास्त दर मोजावे लागले की आरडाओरड होते, मात्र दर कोसळले की शेतकऱ्यांचा विचार होत नाही हे मान्य करताना त्यांनी शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळाला पाहिजे असे नमूद केले. सध्या बाजारात शेतकऱ्यांना मिळणारा भाव आणि ग्राहकांना प्रति किलो मिळणारा कांदा यात तफावत असल्याने मध्यस्थ यंत्रणेबाबत सरकारने विचार करावा अशी सूचना केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन आणि विकास मंडळाने कांद्याचा उत्पादन खर्चासहीत ठरविलेला दर सुमारे ९०० रुपये आहे. त्याचा विचार करून दर कोसळत असताना सरकारने कांदा खरेदी करावा, केंद्रशासनाकडे असलेला राखीव फंड आपत्काळात खरेदीसाठी उपयोगात आणावा, कांद्याला हमी भाव मिळावा अशा विविध सूचना लासलगाव बाजार समितीचे सभापती नानासाहेब पाटील आणि अन्य अधिकाऱ्यांनी केल्या. जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंग कुशवाह तसेच सहकार आणि कृषी खात्याचे अन्य अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Now the idea of ​​farmers' interests is also with the customer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.