आता शेतकरी करणार पीक पेरणीच्या नोंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:16 IST2021-08-15T04:16:55+5:302021-08-15T04:16:55+5:30
निफाड/चांदोरी : स्वतःच्या शेतातील पीक पेरणीची माहिती शेतकऱ्यांनी स्वतः भरावी, त्यातून अचूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने शासनाने राज्यात ...

आता शेतकरी करणार पीक पेरणीच्या नोंदी
निफाड/चांदोरी : स्वतःच्या शेतातील पीक पेरणीची माहिती शेतकऱ्यांनी स्वतः भरावी, त्यातून अचूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने शासनाने राज्यात ई-पीक पाहणी हा उपक्रम हाती घेतला आहे. १५ ऑगस्टपासून हा कार्यक्रम राज्यभरात राबविला जाणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना अँड्रॉइड मोबाइलचा वापर करावा लागणार आहे. या पार्श्वभूमीवर ई-पीक पाहणी प्रबोधन सप्ताह सुरू आहे. या उपक्रमामुळे पीक पेरणी अहवालात शेतकऱ्यांचा प्रत्यक्ष सक्रिय सहभाग वाढणार आहे. याच्या प्रचार, प्रसिद्धीचे काम कृषी विभाग करीत आहे, तसेच त्यावर नियंत्रण ठेवणे, त्याची जबाबदारी अचूक पार पाडणे, यासाठी महसूल विभाग कार्यरत आहे. पीक पेरणीची माहिती भरण्यासाठी शेतकऱ्यांना अँड्रॉइड मोबाइलचा वापर करावा लागणार आहे. पीक पेरणी अहवाल ॲप दिलेल्या लिंकवरून डाऊनलोड केल्यानंतर सर्व माहिती शेतकऱ्यांनी भरावयाची आहे. वैयक्तिक माहिती भरून खातेदार म्हणून नोंदणी करणे महत्त्वाचे आहे. गट नंबर, खाते नंबर, पिकांची माहिती, हंगामनिहाय माहिती आदींची माहिती भरावी लागणार आहे. पिकांचा फोटो काढून तो अपलोड करावा लागणार आहे. ही मोहीम अधिक जलद व सुलभ व्हावी, यासाठी कृषी, महसूल विभाग डेमो ॲप डाऊनलोड करण्यासाठी शेतकऱ्यांना आवाहन करून मार्गदर्शन करीत आहे. त्यासाठी प्रबोधन सप्ताह राबविला जात आहे. १५ ऑगस्टपासून हा उपक्रम गावागावांतून शेतकऱ्यांच्या सहभागातून राबविला जाणार आहे. या अहवालानुसार सात-बारा पत्रकावर पिकांच्या नोंदी होणार आहेत.
-------------------
शेतकऱ्यांच्या सहभागातून माहिती संकलनामध्ये पारदर्शकता आणणे, शेतकऱ्यांचा सक्रिय सहभाग वाढविणे, कृषी पतपुरवठा सुलभ करणे, पीकविमा व पीक पाहणी दावे निकालात काढण्याची प्रक्रिया सोपी व्हावी, नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई करणे शक्य व्हावे, या दृष्टिकोनातून हा उपक्रम हाती घेतला आहे. यासाठी टाटा ट्रस्टने है ॲप विकसित केले आहे. तालुका, जिल्हा, विभाग ते राज्य पातळीवर सनियंत्रण समित्या स्थापन करून हा उपक्रम राबविला जाणार आहे.
-----------------------
राज्य शासनाच्या या ई-पीक पाहणी ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पिकांची अचूक माहिती देणे अतिशय सोपे होणार आहे. पीककर्ज, पीकविमा, तसेच नैसर्गिक आपत्तीत पिकाची नुकसानभरपाई देण्यासाठी सोईस्कर होणार आहे.
- शरद घोरपडे, तहसीलदार, निफाड.