भविष्य निर्वाह निधीतून आता धार्मिक यात्रेचा खर्च
By Admin | Updated: June 3, 2014 02:20 IST2014-06-02T22:03:33+5:302014-06-03T02:20:23+5:30
शासनाने दिली कर्मचार्यांना सूट

भविष्य निर्वाह निधीतून आता धार्मिक यात्रेचा खर्च
शासनाने दिली कर्मचार्यांना सूट
नाशिक : यापुढे आता शासकीय कर्मचार्यांना भविष्य निर्वाह निधीच्या वर्गणीदारांना धार्मिक यात्रेचा खर्च भागविण्यासाठी भविष्य निर्वाह निधीमधून रक्कम (ना परतावा) काढण्यास शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने मंजुरी दिली आहे.
३१ मे रोजीच यासंदर्भात शासननिर्णय झाला आहे. त्यात म्हटले आहे की, महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम १९९८ मधील नियम क्रमांक १६ नुसार वर्गणीदाराची दहा वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर (मध्ये खंड झाला असल्यास खंडित सेवेचा समावेश करून) अथवा नियत सेवानिवृतीपूर्वी दहा वर्षे यापैकी जे आधी घडेल त्यावेळी वर्गणीदाराच्या खाती जमा असलेल्या निधीच्या रकमेतून स्वत:च्या अथवा महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम १९९८ च्या नियम २(३) मधील कुटुंबाच्या व्याख्येमध्ये समाविष्ट असलेल्या वर्गणीदाराच्या कुटुंबातील व्यक्तींच्या धार्मिक यात्रेचा खर्च भागविण्यासाठी रक्कम काढण्यास शासनाने काही अटींच्या अधीन राहून परवानगी दिली आहे. त्यात सदर धार्मिक यात्रेचा प्रत्यक्ष खर्च किंवा खात्यावर जमा निधीच्या अर्धी रक्कम किंवा वर्गणीदाराचे सहा महिन्याचे वेतन यापैकी कमी असलेली रक्कम मंजूर करण्यात यावी. या धार्मिक यात्रेच्या खर्चाची रक्कम शासनसेवेतील संपूर्ण कालावधीत फक्त एकदाच अनुदेय असेल. महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियमामध्ये याप्रमाणे सुधारणा करण्याबाबतची अधिसूचना यथावकाश प्रसिद्ध करण्यात येईल, असे शासननिर्णयात म्हटले आहे. या निर्णयाचा हज यात्रेसाठी जाणार्या मुस्लीम कर्मचारी बांधवांना मुख्यत्वे फायदा होण्याची चिन्हे आहेत. (प्रतिनिधी)