आता कुंभमेळ्याला जात नाही !

By Admin | Updated: July 31, 2015 00:25 IST2015-07-31T00:24:51+5:302015-07-31T00:25:23+5:30

श्रीएम यांची खंत : प्रारंभीचा हेतू उदात्त; आता मूळ उद्देशापासून भरकटला

Now do not go to Kumbh Mela! | आता कुंभमेळ्याला जात नाही !

आता कुंभमेळ्याला जात नाही !

नाशिक : देशातील सारे पंथ, संप्रदायांच्या अनुयायांनी एकत्र येऊन विचारमंथन करावे, असा उदात्त हेतू कुंभमेळा सुरू करण्यामागे होता, आता मात्र तो मूळ उद्देशापासून भरकटल्याने आपण कुंभमेळ्याला जात नाही, अशी खंत आध्यात्मिक गुरू महायोगी श्रीएम तथा मुमताज अली खान यांनी व्यक्त केली.
देशात बंधुभाव निर्माण करण्यासाठी गेल्या १२ जानेवारीपासून त्यांनी कन्याकुमारी ते श्रीनगरपर्यंत ‘वॉक आॅफ होप’ ही पदयात्रा सुरू केली असून, आज ही यात्रा नाशकात पोहोचली. या पार्श्वभूमीवर श्रीएम यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, समुद्रमंथनातून निर्माण झालेल्या अमृताचे थेंब पृथ्वीवर पडले वगैरे या गोष्टी प्रतीकात्मक आहे. मुळात एवढे साधू-महंत एकत्र येतात, तेथेच अमृताची निर्मिती होते. देशातील प्रत्येक संप्रदायाच्या विद्वानांनी नदीकिनारी एकत्र जमावे, विचारांची देवाणघेवाण करावी, असा कुंभमेळ्यामागचा मूळ उद्देश होता. पूर्वीचे कुंभमेळे तसे होतही असत. आता बनावट साधू वाढले आहेत; पण म्हणून ओरिजिनल कोणीच नाहीत, असे नाही. बनावट (ड्युप्लिकेट) तेव्हाच असते, जेव्हा मूळ (ओरिजिनल) अस्तित्वात असते. यापूर्वी आपण काही कुंभमेळ्यांना हजेरी लावली. आता मात्र जाणे बंद केल्याचे ते म्हणाले.
आपल्या पदयात्रेबाबत त्यांनी सांगितले की, देशात एकता प्रस्थापित करण्यासाठी ही यात्रा सुरू केली असून, जाती-धर्मांपलीकडे आपण सारे मानव आहोत, हेच प्रत्येकाला सांगणे आहे. आतापर्यंत आम्ही ३ हजार २०० किलोमीटर अंतर चाललो असून, अद्याप पाच हजार किलोमीटर अंतर पार करायचे आहे. जाऊ तेथे आम्ही मानवतेचे बीज रोवतो आहोत. त्याचा वृक्ष कधी होईल, हे सांगता येणार नाही. ठिकठिकाणी विशिष्ट गटाची स्थापना करीत असून, त्यांना काही काळानंतर ‘टास्क’ दिला जाईल. कोणी कोणत्याही विचारसरणी, धर्माचे असोत, आपण सारे आधी माणूस आहोत, हे विसरू नये, असा संदेश त्यांनी तरुणांसाठी दिला. (प्रतिनिधी)

Web Title: Now do not go to Kumbh Mela!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.