..आता जंगलांवर चोख ‘वॉच’
By Admin | Updated: April 10, 2016 00:14 IST2016-04-09T23:14:12+5:302016-04-10T00:14:42+5:30
..आता जंगलांवर चोख ‘वॉच’

..आता जंगलांवर चोख ‘वॉच’
.नाशिक : जंगलामध्ये होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी व वनक्षेत्रपालांच्या गस्त पथकाला सुरक्षितता प्रदान करण्यासाठी राज्य सरकारने नाशिक वनविभागाला एकूण चौदा ‘पेट्रोलिंग जीप’ उपलब्ध करून दिल्या आहेत. जंगल परिसरातील गैरप्रकार रोखणे वन कर्मचाऱ्यांना सोपे होणार आहे. शहराच्या वनखात्यामध्ये अकरा विशेष वाहने दाखल झाली असून, तीन वाहने अहमदनगरला देण्यात आली आहे. त्यामुळे आता जंगलांवर आता वनक्षेत्रपालांच्या गस्त पथकाचा चोख ‘वॉच’ राहणार आहे.
जंगलातील वृक्षतोड, तस्करी, वन्यजिवांची शिकार, वनऔषधींची चोरी, वणवे पेटविणे आदि गैरप्रकारांना आळा बसावा आणि वन कर्मचाऱ्यांना चोखपणे सुरक्षित गस्त घालता यावी, यासाठी मागील अनेक वर्षांपासून वनविभागाकडून शासनाकडे पाठपुरावा केला जात होता. अखेर वन मंत्रालयाकडून नाशिक वनवृत्त हद्दीसाठी एकूण १४ वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. यापैकी अकरा नाशिक वनविभागाला, तर तीन जीप अहमदनगर वनविभागाला देण्यात आल्या आहेत. ही वाहने केवळ तालुक्याच्या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या वनक्षेत्रपालांनाच वापरता येणार आहेत.
शासनाकडून अद्याप केवळ वरिष्ठ अधिकाऱ्यांनाच वाहने उपलब्ध करून देण्यात आली होती; मात्र आदिवासी भागात तालुक्याच्या ठिकाणी जंगलावर करडी नजर ठेवणाऱ्या वनक्षेत्रपाल, वनरक्षकांना गस्तीसाठीही वाहने वनविभागाकडे नव्हती. त्यामुळे अनेकदा जंगलांच्या भागात गस्त घालताना गस्त पथकाला तस्करांच्या हल्ल्यांनाही तोंड द्यावे लागत होते. दरम्यान, हल्लेखोरांच्या हल्ल्यात वनपाल, वनरक्षक जखमी झाल्याच्याही घटना घडल्या आहेत. एकूणच जंगलातील गस्तीसाठी सुसज्ज वाहन नसल्यामुळे वन कर्मचाऱ्यांसह जंगलांचीही सुरक्षा ऐरणीवर आली होती. (प्रतिनिधी)