आता मिशन पोटनिवडणूक प्रक्रिया सुरू : २० मे रोजी होणार मतदार यादी प्रसिद्ध
By Admin | Updated: May 11, 2014 20:05 IST2014-05-11T20:01:21+5:302014-05-11T20:05:03+5:30
नाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघात पक्षांतर करून उमेदवारी करणारे हेमंत गोडसे व दिनकर पाटील यांच्या रिक्त झालेल्या नगरसेवकपदाच्या जागांवर होणार्या पोटनिवडणुकीची प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाने सुरू केली असून, मतदार यादीचा कार्यक्रम घोषित केला आहे. लोकसभेची रणधुमाळी आटोपल्यानंतर दि. २० मे रोजी दोन्ही प्रभागांची मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार असून, जून महिन्यात पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे.

आता मिशन पोटनिवडणूक प्रक्रिया सुरू : २० मे रोजी होणार मतदार यादी प्रसिद्ध
नाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघात पक्षांतर करून उमेदवारी करणारे हेमंत गोडसे व दिनकर पाटील यांच्या रिक्त झालेल्या नगरसेवकपदाच्या जागांवर होणार्या पोटनिवडणुकीची प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाने सुरू केली असून, मतदार यादीचा कार्यक्रम घोषित केला आहे. लोकसभेची रणधुमाळी आटोपल्यानंतर दि. २० मे रोजी दोन्ही प्रभागांची मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार असून, जून महिन्यात पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे.
नाशिकरोड विभागातील महापालिका प्रभाग क्रमांक ६१ मधून नागरिकांचा मागास प्रवर्गातून निवडून गेलेले मनसेचे हेमंत गोडसे यांनी नाशिक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेची साथ सोडत शिवसेनेत प्रवेश केला; परंतु तांत्रिकदृष्ट्या ते मनसेचेच नगरसेवक असल्याने लोकसभा निवडणुकीत उमेदवारी करण्यात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी गोडसे यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिला होता. सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक १७ मधून नागरिकांचा मागास प्रवर्गातून कॉँग्रेसचे दिनकर पाटील नगरसेवक म्हणून निवडून गेले होते. परंतु पाटील यांनीही ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कॉँग्रेसला सोडचिठ्ठी देत बसपाच्या तंबूत प्रवेश केला होता. पक्षांतराचा फटका उमेदवारीला बसू नये यासाठी पाटील यांनीही आपल्या नगरसेवकपदाचा राजीनामा देऊन बसपातर्फे लोकसभा निवडणूक लढविली. माकपाचे नगरसेवक ॲड. तानाजी जायभावे या आणखी एका उमेदवाराने लोकसभा निवडणुकीत पक्षाकडूनच उमेदवारी केलेली असल्याने त्यांचे नगरसेवकपद कायम राहिले आहे. हेमंत गोडसे व दिनकर पाटील यांच्या रिक्त झालेल्या जागांवर आता पोटनिवडणुकीची प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाने सुरू केली आहे. त्यासंबंधीची अधिसूचना प्रसिद्ध झाली असून, राज्यातील पुणे, उल्हासनगर, सोलापूर, लातूर, बृहन्मुंबई, औरंगाबाद, कोल्हापूर, नांदेड-वाघाळा यांसह नाशिकच्याही रिक्त जागांवर पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. २०१२ मध्ये झालेल्या पालिका निवडणुकीत प्रभाग ६१ मध्ये मनसेचे हेमंत गोडसे यांनी शिवसेनेचे त्यावेळचे उपमहानगरप्रमुख केशव पोरजे यांचा पराभव केला होता, तर राष्ट्रवादीचे विक्रम कोठुळे हे तिसर्या क्रमांकावर राहिले होते. आता पोटनिवडणुकीत मनसेकडून सदर जागा आपल्या ताब्यात घेण्यास शिवसेना इच्छुक असून, पुन्हा एकदा केशव पोरजे यांच्या नावाची चर्चा होऊ लागली आहे. मनसेला मात्र सक्षम अशा उमेदवाराचा शोध घ्यावा लागणार आहे. सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक १७ मध्ये कॉँग्रेसकडून दिनकर पाटील पालिकेवर निवडून गेले होते. पाटील यांनी मनसेचे इंद्रभान सांगळे यांचा पराभव केला होता. याठिकाणीही राष्ट्रवादीचे सदाशिव माळी तिसर्या क्रमांकावर राहिले होते, तर सेनेचे उमेदवार साहेबराव जाधव चौथ्या क्रमांकावर फेकले गेले होते. लोकसभा निवडणुकीत दिनकर पाटील यांनी विजयाचा दावा केला असला, तरी प्रभागात मात्र पालिका पोटनिवडणुकीत पुन्हा एकदा पाटीलच रिंगणात असतील, अशी चर्चा ऐकायला मिळत आहे. पालिकेच्या मागील निवडणुकीत या प्रभागात कॉँग्रेस-राष्ट्रवादी अशी म्हणायला मैत्रीपूर्ण परंतु संघर्षमय लढत झाली होती. ३१ मे रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध झाल्यानंतर पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीला प्रत्यक्षात सुरुवात होईल.
२०१२ मधील निवडणुकीची स्थिती
प्रभाग क्रमांक ६१ (अ)
हेमंत गोडसे- मनसे- ५०१८
केशव पोरजे- सेना- ३२६५
विक्रम कोठुळे- रा.कॉँ.- १७१०
प्रभाग क्रमांक १७ (अ)
दिनकर पाटील- कॉँग्रेस- ७४३४
इंद्रभान सांगळे- मनसे- ३७८८
सदाशिव माळी- रा.कॉँ.- १५१६
साहेबराव जाधव- सेना- १४०६
सुनील शेंद्रे- जनराज्य- १९८