आता अॅँड्रॉइड रेडिओ जयभीम
By Admin | Updated: April 14, 2016 00:50 IST2016-04-14T00:10:58+5:302016-04-14T00:50:24+5:30
नाशिकच्या युवकाची निर्मिती : आज होणार आंतरराष्ट्रीय उद्घाटन

आता अॅँड्रॉइड रेडिओ जयभीम
नाशिक : राज्यघटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पंचविसाव्या जयंतीनिमित्ताने त्यांच्या विचारांचे प्रचार प्रसार करणारे विविध उपक्रम आयोजित केले जात आहेत. मात्र, त्यांच्या विचारांना वाहिलेला खास अॅँड्रॉइड रेडिओ जयभीम नाशिकच्या एका युवकाने तयार केले असून गुरुवारी (दि. १४) आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने या रेडिओचे उद्घाटन अमेरिका येथे रिपाइंचे नेते रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तसेच मुंबई येथेही मानखुर्द येथून प्रसारणाचा प्रारंभ होणार आहे.
नाशिकच्या राहुल श्रीवंश या युवकाने हा रेडिओ तयार केला आहे. सध्या अॅँड्रॉइड फोन सर्वांच्याच हातात असतो, अशा वेळी त्याचा चांगल्या कामांसाठी वापर व्हावा या विचाराने त्यांनी हे अॅँड्रॉइड रेडिओचे अॅप तयार केले असून ते प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. देशाला राज्य घटना देणारे आणि केवळ दलितांनाच नव्हे तर सर्वच समाजाला प्रेरणादायी असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य कोणीही विसरू शकत नाही. सध्या त्यांचा १२५ वा जयंती उत्सव असल्याने यानिमित्ताने साऱ्यांनाच त्यांचे कार्य कळावे आणि अगदी ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकांनादेखील यानिमित्ताने केवळ आंबेडकरांची माहिती तसेच बौद्ध धर्मासंबंधी भन्तेजींची प्रवचने उपलब्ध आहेत. इतकेच नव्हे तर अन्य जीवनावश्यक माहिती, जसे करिअर जॉब्ज, शासकीय योजना, स्वयंरोजगार, व्यवसाय समुपदेशन, लघु उद्योग यासंदर्भातील माहिती उपलब्ध आहे.
तसेच याच रेडिओवर राष्ट्रीय ते स्थानिक घडामोडी शेअर करता येतील तसेच हा कम्युनिटी रेडिओ असल्याने त्यावर सामाजिक घडामोडी आणि कायदेशीर ज्ञान, व्यसनमुक्तीसारख्या विषयांवर प्रबोधन देखील करण्यात येत आहे. भीमगीते आणि संगीताचे अन्य कार्यक्रमही जयभीमवर उपलब्ध आहेत. या रेिडओचे वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही अॅँड्रॉइड फोनवर प्लेस्टोअरमधून तो डाउनलोड करता येईल. सध्या फोरजीचा जमाना असला तरी टू जी स्पीडवर तो हेडफोनशिवाय मोठ्या आवाजात ऐकता येईल. तसेच बफिरिंग होणार नसल्याने विना व्यत्यय प्रसारण ऐकता येईल. जगाच्या कानाकोपऱ्यातून ऐकता येईल. श्रीवंश यांनी यापूर्वी रेडिओ नमकीन हा कम्युनिटी रेडिओ, तर शिवा हा खास शेतकऱ्यांसाठी अॅँड्रॉइड रेडिओ सुरू केला आहे.