कुख्यात गँगस्टर रवी पुजारी पुन्हा ऑर्थररोड तुरुंगात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:18 IST2021-04-30T04:18:31+5:302021-04-30T04:18:31+5:30
--- नाशिक : येथील पथर्डी फाटा येथे सुमारे दहा वर्षांपूर्वी दहा कोटींच्या खंडणी वसुलीसाठी एका बिल्डरच्या कार्यालयात गोळीबार केल्याप्रकरणी ...

कुख्यात गँगस्टर रवी पुजारी पुन्हा ऑर्थररोड तुरुंगात
---
नाशिक : येथील पथर्डी फाटा येथे सुमारे दहा वर्षांपूर्वी दहा कोटींच्या खंडणी वसुलीसाठी एका बिल्डरच्या कार्यालयात गोळीबार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या गँगस्टर रवी पुजारी यास गुरुवारी (दि.२९) नाशिकच्या विशेष मकोका न्यायालयात मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कडेकोट बंदोबस्तात हजर केले. सुमारे तासाभराच्या सुनावणीत जिल्हा व सत्र न्यायाधीश जी.पी देशमुख यांनी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. पुजारीला पुन्हा ऑर्थररोड तुरुंगात नेण्यात आले आहे.
बांधकाम व्यावसायिकांच्या इमारतीचे काम सुरू असताना रवी पुजारी याने सुमारे दहा कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. ''खंडणी न दिल्यास गेम करू..'' अशी धमकी संबंधित व्यावसायिकाला देण्यात आली होती. त्यानंतर पाथर्डी फाटा येथील एका मोठ्या गृहप्रकल्पाच्या ठिकाणी उभारलेल्या बिल्डरच्या कार्यालयावर २५ नोव्हेंबर २०११ साली गोळीबार करण्यात आला होता. यामध्ये येथील एक कर्मचारी गंभीर जखमी झाला होता. या गुन्ह्यात चौघा संशयित आरोपींपैकी तिघा आरोपींना २०१९ साली जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. याप्रकरणी नाशिकच्या इंदिरा नगर पोलीस ठाण्यात प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि या गुन्ह्याचा तपास नंतर राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे देण्यात आला. पोलिसांनी काही दिवसांपूर्वीच फरार पुजारी यास बेड्या ठोकल्या. त्याला गेल्या शुक्रवारी नाशिकच्या विशेष मकोका न्यायालयात कडेकोट बंदोबस्तात मुंबई पोलिसांनी हजर केले होते. न्यायालयाने त्यास सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. कोठडीची मुदत पूर्ण झाल्याने पोलिसांनी पुन्हा पुजारी यास आज न्यायालयापुढे उभे केले. सरकारी पक्षाच्यावतीने विशेष सरकारी अभियोक्ता अजय मिसर यांनी युक्तिवाद केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत न्यायालयाने पुजारी यास १२ मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.
----इन्फो---
जिल्हा रुग्णालयात कोरोना चाचणी
कुख्यात गँगस्टर रवी पुजारी याचे आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी टोळीशी असलेले संबंध व टोळ्यांमधील वैमनस्य लक्षात घेत सुरक्षेच्या दृष्टीने रवी पुजारी यास सशस्त्र पोलीस बंदोबस्तात मुंबईच्या ऑर्थर रोड तुरुंगातून नाशिकला आणण्यात आले होते. सकाळी ११ वाजता त्यास न्यायालयात उभे करण्यात आले. न्यायालयीन प्रक्रिया आटोपताच पुजारी याला कोरोना नमुना चाचणीकरिता नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. तेथून कडेकोट बंदोबस्तात पुन्हा त्यास मुंबईला हलविण्यात आले.
----इन्फो----
'' आवाज'' तपासण्यासाठी नमुने तज्ज्ञांकडे
बांधकाम व्यावसायिकाला पुजारी याने दिलेल्या धमकीचे कॉल रेकॉर्डिंग न्यायालयासमोर सादर करून त्याच्या आवाजाचे नमुने घेण्यासाठी तसेच उर्वरित दोन्ही फरार आरोपींच्या शोधासाठी पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती. न्यायालयाने आवाजाचे नमुने तज्ज्ञांकडे पडताळणीसाठी सोपविण्याचे आदेश दिले. दरम्यान, मुंबई गुन्हेशाखेचा या गुन्ह्याचा तपास पूर्ण झाल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. पुजारीचे या प्रकरणातील फोन कॉल तपासणीसाठी त्याच्या आवाजाचे नमुने घेण्यात आले असून, ते तज्ज्ञांकडे रवाना करण्यात आले आहेत. रवी पुजारी याने ठाणे येथील सहा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची कबुली पोलिसांना दिली आहे.