शेतकऱ्यांना लाखो रुपयांच्या शेतसारा रकमेच्या नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:40 IST2021-02-05T05:40:20+5:302021-02-05T05:40:20+5:30
तहसीलदार कार्यालयाकडून गेल्या दोन-तीन दिवसापासून नाशिक तालुक्यातील देवळालीगाव, विहितगाव, वडनेर, नानेगाव, सामनगावरोड, गंगावरे, गिरणारे, सावरगाव, सातपूर आदी गावातील शेकडो ...

शेतकऱ्यांना लाखो रुपयांच्या शेतसारा रकमेच्या नोटिसा
तहसीलदार कार्यालयाकडून गेल्या दोन-तीन दिवसापासून नाशिक तालुक्यातील देवळालीगाव, विहितगाव, वडनेर, नानेगाव, सामनगावरोड, गंगावरे, गिरणारे, सावरगाव, सातपूर आदी गावातील शेकडो शेतकऱ्यांना लाखो रुपयाच्या शेतसारा वसुलीच्या नोटिसा पाठविल्या आहेत. तसेच सात दिवसाच्या आत नोटीसमध्ये दिलेली रक्कम न भरल्यास कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. बहुतेक शेतकऱ्यांची जितकी शेतीची जागा आहे तिची किंमतदेखील तितकी नाही, त्याच्यापेक्षा जास्त रकमेच्या शेतसारा वसुलीच्या नोटिसा पाठविण्यात आल्याने शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे. ग्रामीण भागात अनेक शेतकरी शेतात किंवा मळ्यात घर बांधून राहतात. तसेच शेती करण्यासाठी व राखणदारी करण्याकरीता कच्चे-पक्के छोटेसे झोपडे किंवा घर बांधतात. सामनगावरोड येथील त्रंबक भोर यांची १८ गुंठे शेतजमीन असून, त्यांना २४ लाख रुपयाची शेतसारा वसुली नोटीस पाठविण्यात आली आहे. अशाच पद्धतीने शेकडो शेतकऱ्यांना अवाजवी रकमेच्या लाखो रुपयांच्या नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. तहसील कार्यालयाच्या अजब कार्यपद्धतीमुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
याप्रश्नी माजी आमदार योगेश घोलप यांनी शेतकऱ्यांसह शनिवारी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांची भेट घेऊन चुकीच्या पद्धतीने पाठविण्यात आलेल्या नोटिसा मागे घेण्याची मागणी केली. शेतजमीन जागेची जितकी किंमत नाही, त्याच्यापेक्षा जास्त रकमेची नोटीस पाठविण्यात आल्याचे घोलप यांनी मांढरे यांच्या निदर्शनास आणून दिले. याबाबत मांढरे यांनी सविस्तर माहिती घेऊन चौकशी करून चुकीच्या पद्धतीने नोटिसा दिल्या असेल तर थांबविण्यात येईल, असे सांगितल्याचे घोलप यांनी सांगितले.