नाशकातील दोनशे उद्योजकांना नोटिसा

By Admin | Updated: May 1, 2017 01:56 IST2017-05-01T01:56:48+5:302017-05-01T01:56:57+5:30

भूखंड ताब्यात घेऊन विकासाविना अडवून ठेवणाऱ्या उद्योजकांवर औद्योगिक विकास महामंडळाने वक्रदृष्टी केली आहे.

Notices to 200 industrialists in Nashik | नाशकातील दोनशे उद्योजकांना नोटिसा

नाशकातील दोनशे उद्योजकांना नोटिसा

नाशिक : ‘मेक इन नाशिक’चा नारा उद्योजक देत असले तरी नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रात भूखंडच उपलब्ध नसल्याने गुंतवणूक तरी कोठे करावी, असा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे भूखंड ताब्यात घेऊन विकासाविना अडवून ठेवणाऱ्या उद्योजकांवर औद्योगिक विकास महामंडळाने वक्रदृष्टी केली आहे.
नाशिकमधील दोनशे उद्योेजकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत, तर ज्या उद्देशासाठी भूखंड घेतला तो उद्देश साध्य होत नसल्याने अनेक वेळा संधी देऊनही दुर्लक्ष करणाऱ्या भूखंडधारकांचे भूखंड परत घेण्यासाठी ही कारवाई औद्योगिक विकास महामंडळाकडून सुरू करण्यात आली आहे. नाशिक बरोबरच अहमदनगर येथील भूखंडधारकांवरही कारवाईचा बडगा उभारण्यात आला असून, दोन्ही मिळून ३२९ भूखंडधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यापैकी तीस भूखंड ताब्यात घेण्याची कारवाई लवकरच सुरू करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे उद्योजकांचे धाबे दणाणले आहे.
उद्योग सुरू करण्यासाठी औद्योगिक विकास महामंडळाकडून अनेक लोकांनी भूखंड घेतले आहेत. चार ते पाच वर्षांचा कालावधी लोटला तरी अनेक भूखंडमालकांनी उद्योग सुरू केलाच नाही. अशा भूखंडधारकांना वेळोवेळी संधी देण्यात आली आहे. शिवाय अशा लोकांसाठी ‘उद्योग संजीवनी’ योजनादेखील आणली होती. तरीही अशा लोकांनी कोणत्याही प्रकारे प्रतिसाद दिला नाही. उलट उद्योग व्यवसायाच्या नावाखाली सवलतीच्या दरात भूखंड घेऊन चढ्या भावाने भूखंड विक्री करण्याचे प्रकार वाढले आहेत. ज्या उद्देशाने भूखंड घेतला तो उद्देश सफल होताना दिसत नसल्याचे लक्षात आल्यानंतर औद्योगिक विकास महामंडळाने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
औद्योगिक कारणांसाठी मिळविलेले भूखंड परत घेण्याची नोटीस अनेकदा देण्यात आलेली आहे. काही भूखंडधारकांनी नोटिसीनंतर मुदत मागवून घेत औद्योगिक वापर सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, पुन्हा एकदा प्रशासनाला अंधारात ठेवण्यात आल्यानंतर आता प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Notices to 200 industrialists in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.