सेंट फ्रान्सिस हायस्कूलला शिक्षण मंडळाची नोटीस
By Admin | Updated: September 4, 2015 23:58 IST2015-09-04T23:58:27+5:302015-09-04T23:58:55+5:30
तक्रारी : प्रगतिपुस्तक दाखविण्याचे आदेश

सेंट फ्रान्सिस हायस्कूलला शिक्षण मंडळाची नोटीस
नाशिक : तिडके कॉलनी व राणेनगर येथील सेंट फ्रान्सिस हायस्कूलला मनपा शिक्षण मंडळाने नोटीस बजावली असून, केवळ शुल्क भरले नाही म्हणून विद्यार्थ्यांना प्रगतिपुस्तक दाखविण्यास प्रतिबंध करू नये, असे आदेश दिले आहेत.
पालकांच्या तक्रारीवरून मनपा शिक्षण मंडळाच्या तक्रार निवारण समितीपुढे दि. २० आॅगस्ट रोजी संस्थाचालक व पालकांची सुनावणी घेण्यात आली होती. या सुनावणीदरम्यान शुल्क न भरणाऱ्या मुलांना वर्गात वेगळे बसविले जाते, निकालपत्रक दिले जात नाही, उत्तरपत्रिका तपासल्या जात नाहीत यांसह अनेक मुद्दे पालकांनी उपस्थित केले होते. त्यावेळी संस्थेकडून यापुढे असे प्रकार होणार नसल्याची ग्वाही दिली होती. परंतु तक्रार निवारण समितीकडे पुन्हा त्याच तक्रारी आल्याने शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी उमेश डोंगरे यांनी हायस्कूलला नोटीस बजावली आहे. या नोटिसीत म्हटले आहे, शाळेने सर्व विद्यार्थ्यांना प्रगतिपुस्तक, शैक्षणिक अहवाल विद्यार्थी व पालकांना पाहण्यासाठी उपलब्ध करून द्यावे. पालकांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क भरले नाही म्हणून त्यांना प्रगतिपुस्तक व अहवाल दाखविण्यास प्रतिबंध करू नये. प्रगतिपुस्तक अथवा शैक्षणिक अहवाल उपलब्ध करून न दिल्यास योग्य ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही प्रशासनाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)