हॉटेल व्यावसायिकास दहा कोटी दंडाची नोटीस
By Admin | Updated: March 16, 2017 00:55 IST2017-03-16T00:54:29+5:302017-03-16T00:55:07+5:30
महसूल खाते सुखावले : वसुलीसाठी जोरदार प्रयत्न

हॉटेल व्यावसायिकास दहा कोटी दंडाची नोटीस
नाशिक : पाथर्डी शिवारात एका हॉटेल बांधकामासाठी परवानगीपेक्षा अधिक गौणखनिजाचे उत्खनन करणाऱ्या हॉटेल व्यावसायिकास पाच पट दंडासहीत दहा कोटी रुपयांची नोटीस नाशिक तहसील कार्यालयाने बजावली असून, मार्च महिन्याचे उद्दिष्टपूर्तीसाठी प्रशासन वणवण करीत असताना त्यात थेट दहा कोटीचे उत्पन्न मिळणार असल्याच्या वार्तेने सारेच सुखावले आहेत.
पाथर्डी शिवारात एका तारांकित हॉटेलचे काम करण्यासाठी संबंधितांनी एक ब्रास गौणखनिजाचे उत्खनन करण्याची परवानगी घेण्यात आली व त्यासाठी त्यांनी महसूल खात्याकडे रितसर रॉयल्टीही भरली. परंतु हॉटेलचालकाने परवानगीपेक्षा अधिक गौणखनिजाचे उत्खनन केल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेत प्रांत अधिकारी राहुल पाटील यांनी तत्काळ पथकासह घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. विशेष म्हणजे ज्या हॉटेल व्यावसायिकास गौणखनिज उत्खननाची परवानगी तहसील कार्यालयाने दिली, त्या तहसील कार्यालयाला मात्र या कारवाईपासून दूर ठेवण्यात आले होते. पथकाने केलेल्या पंचनाम्यानुसार जवळपास अठरा ब्रास गौणखनिजाचे उत्खनन करण्यात आल्याचे आढळून आले. महसूल कायद्यानुसार बेकायदेशीर उत्खनन असेल तर त्यापोटी पाच पट दंड आकारण्याची तरतूद असली तरी, ज्या तत्परतेने महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांनी हॉटेलच्या बांधकाम स्थळी जाऊन पंचनामे केले, त्या महसूल खात्याने नंतर मात्र बोटचेपी भूमिका घेतली. परंतु या संदर्भात प्रसिद्धिमाध्यमातून वाच्यता होताच महसूल खात्याने संबंधित हॉटेल व्यावसायिकास दंडाची नोटीस बजावली. (प्रतिनिधी)