१५०० बांधकाम व्यावसायिकांना नोटिसा
By Admin | Updated: November 7, 2015 22:40 IST2015-11-07T22:29:17+5:302015-11-07T22:40:53+5:30
महापालिका : नगररचना विभागाकडून कार्यवाही

१५०० बांधकाम व्यावसायिकांना नोटिसा
नाशिक : गेल्या दीड ते दोन वर्षांपासून बांधकाम आराखड्याला मंजुरी घेऊनही पूर्णत्वाच्या दाखल्यासाठी मागणी अर्ज न करणाऱ्या शहरातील १५०० बांधकाम व्यावसायिकांना महापालिकेच्या नगररचना विभागाने नोटिसा बजावण्यास सुरुवात केली आहे. पूर्णत्वाच्या दाखल्यासाठी अर्जच येत नसल्याने महापालिकेला कोट्यवधीच्या महसुलावर पाणी सोडावे लागत आहे.
गेल्या दीड ते दोन वर्षांपासून महापालिकेत बांधकाम व्यावसायिकांकडून इमारत पूर्णत्वाचा दाखल अथवा भोगवटा प्रमाणपत्रासाठी अर्जच येत नसल्याने महापालिकेला मोठ्या महसुलाला मुकावे लागत आहे. इमारत पूर्णत्वाच्या दाखल्याच्या माध्यमातून महापालिकेला सुमारे ३५ ते ४० कोटी रुपयांचा महसूल प्राप्त होत असतो. परंतु गेल्या दीड-दोन वर्षांत या महसुलात मोठ्या प्रमाणावर घसरण झालेली आहे. त्यामुळे आता महापालिकेने दीड ते दोन वर्षांपूर्वी बांधकामासाठी आराखड्याला मंजुरी घेणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांना नोटिसा बजावण्यास सुरुवात केली आहे. संबंधित बांधकाम व्यावसायिकांनी नोटीस प्राप्त झाल्यानंतर १५ दिवसांच्या आत नगररचना विभागाला बांधकामाच्या सद्यस्थितीचा अहवाल द्यायचा आहे. इमारतीचा आराखडा मंजूर झाल्यानंतर इमारत पूर्ण झाली असल्यास बांधकाम पूर्णत्वाचा दाखला का प्राप्त केला नाही अथवा इमारतीचे काम अर्धवट असेल, तर त्यासंबंधीची माहिती सादर करावयाची आहे.
बांधकाम व्यावसायिकांकडून इमारत पूर्णत्वाच्या दाखल्यासाठी अर्जच केले जात नसल्याने घर खरेदी करणाऱ्या अनेक ग्राहकांकडूनही नगररचना विभागाला विचारणा होत आहे. त्याचीही दखल घेत नगररचना विभागाने संबंधित बांधकाम व्यावसायिकांना नोटीस बजावली आहे. (प्रतिनिधी)