प्रचारात नाही, पण विजयोत्सवात सामील
By Admin | Updated: May 17, 2014 00:31 IST2014-05-17T00:01:15+5:302014-05-17T00:31:57+5:30
नाशिक : नाशिक लोकसभेसाठीच्या मतदानाच्या दोन दिवस आधी महायुतीत असतानाही शिवसेना-भाजपा पदाधिकार्यांकडून सन्मानजनक वागणूक मिळत नसल्याच्या कारणास्तव महायुतीच्या विरोधात काम करण्याचा इशारा देणारे रिपाइंचे पदाधिकारी हेमंत गोडसे विजयी होताच त्यांच्या विजयोत्सवात सामील झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

प्रचारात नाही, पण विजयोत्सवात सामील
नाशिक : नाशिक लोकसभेसाठीच्या मतदानाच्या दोन दिवस आधी महायुतीत असतानाही शिवसेना-भाजपा पदाधिकार्यांकडून सन्मानजनक वागणूक मिळत नसल्याच्या कारणास्तव महायुतीच्या विरोधात काम करण्याचा इशारा देणारे रिपाइंचे पदाधिकारी हेमंत गोडसे विजयी होताच त्यांच्या विजयोत्सवात सामील झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.
लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना-भाजपाच्या युतीमध्ये रिपाइं (आठवले गट) सामील झाल्यानंतर महायुतीचे स्वरूप आले होते. त्यानंतर निवडणुकीपूर्वी राज्यभर महायुतीचे मेळावे झाले होते. नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीचे हेमंत गोडसे उमेदवार असल्याने त्यांच्या प्रचारासाठी महायुतीतील सारे पक्ष झाडून कामाला लागले होते. असे असतानाही रिपाइं (आठवले गट) चे पदाधिकारी प्रचारात दिसून आले नव्हते. भाजपाचा कार्यकर्ता मेळावा झाला त्यात शिवसेनेच्या पदाधिकार्यांना निमंत्रित करण्यात आले होते; परंतु रिपाइंच्या पदाधिकार्यांना निमंत्रण नव्हते. तसेच मतदारसंघातही प्रचारादरम्यान रिपाइंच्या कार्यकर्त्यांना सामील न करण्यात आल्याने मतदानाच्या दोनदिवस आधी रिपाइंच्या पदाधिकार्यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपा-शिवसेनेवर टीकेची झोड उठविली आणि रिपाइंच्या पदाधिकार्यांना सन्मानजनक वागणूक दिली जात नसल्याबद्दल महायुतीचा विचार करण्याचा इशाराच देत प्रचारात सामील झाले नव्हते. एवढेच नाही, तर महायुतीच्या प्रचाराच्या रॅलीमध्येही रिपाइं कार्यकर्ते अन् त्यांचे ध्वज दिसले नव्हते.
दरम्यान, आज महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे विजयी होताच त्यांच्या स्वागताच्या छोटेखानी मिरवणुकीमध्ये भगव्या ध्वजाबरोबरच रिपाइंचे निळे ध्वजही मानाने फडकत होते. एवढेच नाही, तर रिपाइंचे शहराध्यक्ष पवन क्षीरसागर हे विजयी मेळाव्याच्या व्यासपीठावर विराजमान झाल्याने काही शिवसैनिकांच्या भुवया मात्र उंचावल्या.