साठ्याचा हिशेब लागेना; पाणीयोजना संकटात

By Admin | Updated: February 9, 2016 22:36 IST2016-02-09T22:35:56+5:302016-02-09T22:36:21+5:30

पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

Not counting the stock; In the water shortage crisis | साठ्याचा हिशेब लागेना; पाणीयोजना संकटात

साठ्याचा हिशेब लागेना; पाणीयोजना संकटात

नांदूरशिंगोटे : तालुक्यातील सर्वात मोठ्या भोजापूर धरणातून मोठ्या प्रमाणात पाणीचोरी होत आहे. धरणातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत आहे. भविष्यात पाणीयोजना संकटात सापडण्याची शक्यता असताना, धरणातील शिल्लक पाणीसाठ्याचा हिशेबात ताळमेळ बसत नसल्याचे आकडेवारीतून दिसून येते.
धरणातील गेल्या चार महिन्यांची आकडेवारी बघितल्यानंतर शिल्लक पाणीसाठ्यात तफावत आढळून येत असल्याने पाण्याची चोरी होत असल्याचे दिसून येते. पाटबंधारे खात्यातील अधिकाऱ्यांच्या कृपाशीर्वादानेच पाणीउपसा होत असल्याची चर्चा आहे. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांकडे अवैध पाणीचोरीकडे दुर्लक्ष केल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
पाणीचोरी रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना होत नसल्याने पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत असून, उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने ३६१ दक्षलक्ष घनफूट साठवण क्षमता असलेल्या भोजापूर धरणात यावर्षी केवळ १८७ दक्षलक्ष घनफूट म्हणजे ५२ टक्के पाणी आले होते. यावर्षी तीव्र टंचाईच्या झळा बसत असतानाच पावसाळ्यात म्हाळुंगी नदीद्वारे धरणात पाणी येण्यास प्रारंभ झाल्यानंतर शेतकऱ्यांनी पाणीउपशाला प्रारंभ केला होता. पावसाळा सुरू होण्यापूर्वी धरणात केवळ मृत पाणीसाठा शिल्लक होता.
धरणात केवळ १३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. रात्रीच्या वेळी धरणातील पाण्यात सुमारे २० अश्वशक्तीच्या जलपऱ्या टाकल्या जातात. त्याद्वारे पाणीउपसा केला जात असल्याची चर्चा आहे. पाटबंधारे विभागाकडून अवैध पाणीउपशाला आळा घातला जात नसल्याने पाणीयोजनेच्या लाभक्षेत्रातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. धरणातून मनेगावसह १६ गाव व कणकोरीसह पाच गाव नळपाणीपुरवठा योजना राबविण्यात आल्या आहेत. भोजापूर धरणातून सध्या दररोज मोठ्या प्रमाणात पाणीउपसा होत असल्याने तो रोखण्याची मागणी नळपाणीपुरवठा योजनेत सहभागी असलेल्या गावांतील नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)

Web Title: Not counting the stock; In the water shortage crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.