कर्मचाऱ्यांना बोनस नव्हे अॅडव्हान्स
By Admin | Updated: October 24, 2016 00:10 IST2016-10-24T00:10:16+5:302016-10-24T00:10:49+5:30
आरोग्य विद्यापीठ : शासनदरबारी पुन्हा अपयशी

कर्मचाऱ्यांना बोनस नव्हे अॅडव्हान्स
नाशिक : कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याबाबत व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत सकारात्मक चर्चा होण्याचे गाजर दाखविण्यात आल्यामुळे कर्मचाऱ्यांना सानुग्रहाची अपेक्षा असतानाच विद्यापीठ व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांना ‘अॅडव्हान्स’ देऊ केल्याने सानुग्रहाच्या विषयाला पूर्णविराम मिळाला आहे. विशेष म्हणजे विद्यापीठ निधीतील कर्मचाऱ्यांची मुदत एप्रिल २०१७ मध्ये संपत असल्याने त्यांना अॅडव्हान्स देताना शासन सेवेतील नियमित अधिकाऱ्यांना संबंधित कर्मचाऱ्यांची हमी द्यावी लागणार आहे. आरोग्य विज्ञान विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना २०१४ मध्ये सानुग्रह अनुदान देण्यात आले होते. त्यानंतर मात्र शासनाने हस्तक्षेप करीत सानुग्रह देण्यास हरकत घेतली होती. कर्मचाऱ्यांना यंदा सानुग्रह देण्यासाबाबत विद्यापीठ सकारात्मक असल्याचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी कर्मचाऱ्यांशी चर्चा करताना सांगितले होते. कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी याप्रकरणी लक्ष घातल्याचे सांगून कर्मचाऱ्यांना यंदा दिवाळी गोड जाईल, असे आश्वासन दिले होते. परंतु आता विद्यापीठाने कर्मचाऱ्यांना दहा हजार रुपये अॅडव्हान्स घेऊन जाण्याचे पत्र काढल्यामुळे शासनदरबारी सानुग्रह विषय मान्य करण्यात आला नसल्याचे यावरून दिसून येते. विद्यापीठाचे कामकाज कमी मनुष्यबळावर चालते. त्यामुळे एका कर्मचाऱ्यावर इतर अनेक जबाबदाऱ्या असतात, त्यांना अतिरिक्त कामकाज करावे लागते. विशेष म्हणजे ही सर्व कामे विहित वेळेत पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते. त्यामुळे त्यांना सानुग्रह सुरू करावे, अशी कर्मचाऱ्यांची मागणी होती. विद्यापीठ निधीतून सानुग्रह देण्यात यावे, शासनाचा कोणत्याही हस्तक्षेप असण्याचे कारणच नाही, असा युक्तिवादही कर्मचाऱ्यांनी केला होता. मात्र कर्मचाऱ्यांना यंदाही सानुग्रह मिळणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानेच त्यावर उतारा म्हणून अॅडव्हान्स देण्याची तयारी विद्यापीठाने केली आहे. याबाबतचे परिपत्रकही विद्यापीठात वाचून दाखविण्यात आले. (प्रतिनिधी)