नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला नोटाबंदीचा निर्णय हा इन्स्टंट इडलीसारखा असून, कोणताही अभ्यास आणि धोरण न ठरवता घाईत घेतलेला हा निर्णय असल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला. यातून देशाला सावरायला बराच वेळ लागेल असेही आंबेडकर म्हणाले. नाशिकमध्ये आयोजित पक्षाच्या एका कार्यक्रमासाठी अॅड. प्रकाश आंबेडकर नाशिकमध्ये आले असता त्यांनी पत्रकार परिषदेत नोटाबंदी धोरणावर तीव्र टीका केली. रिझर्व्ह बॅँकेशी चर्चा न करता सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेतला आहे. सरकारने हा निर्णय रिझर्व्ह बॅँकेकडे घेऊन जाणे आणि त्यांचे मत मागविले असते तर ही कायदेशीर प्रक्रिया झाली असती, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले. (प्रतिनिधी)पैसे वाटायला आले तर खुशाल लुटाभाजपा हा पैसेवाल्यांचा पक्ष असून, निवडणुकीच्या काळात कुणी पैसे वाटायला आले तर लक्ष्मीचे स्वागत करा असे मी म्हणणार नाही, तर लूट करा असेच म्हणेन असे विधान आंबेडकर यांनी केले. जोपर्यंत लुटणार नाही तोपर्यंत वाटप थांबणार नाही, असेही ते म्हणाले. वाटप रोखण्यासाठीची यंत्रणा इलेक्शन कमिशनकडे नाही तसेच पोलीस यंत्रणाही वाटप रोखू शकत नाही. या उलट पोलीस वाटप कुठे होते याची वाटच पाहत असतात. त्यामुळे पोलिसांनीही लुटावे असा सल्लाही आंबेडकर यांनी दिला. नेहमीच संयमी भूमिका मांडणारे नेते म्हणून प्रकाश आंबेडकर यांची ख्याती असताना त्यांनी पैसे लुटण्याचा सल्ला दिल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या.
नोटाबंदीचा निर्णय इन्स्टंंट इडलीसारखा
By admin | Updated: January 12, 2017 01:20 IST