उत्तर महाराष्ट्रात खरिपाच्या ९५ टक्के पेरण्या पूर्ण
By Admin | Updated: August 26, 2016 23:58 IST2016-08-26T23:57:52+5:302016-08-26T23:58:01+5:30
समाधानकारक पाऊस : डाळींची लागवड वाढली

उत्तर महाराष्ट्रात खरिपाच्या ९५ टक्के पेरण्या पूर्ण
नाशिक : राज्यात यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने उत्तर महाराष्ट्रात खरिपाच्या ९५ टक्के पेरण्या झाल्या आहेत. विशेष म्हणजे अनेक खरीप पिकांच्या पेरण्या शंभर टक्क्यांहून अधिक झाल्या आहेत. डाळींची लागवडदेखील अधिक झाली आहे.
गेल्या वर्षी राज्यात समाधानकारक पाऊस नव्हता. अगदी पिण्याच्या पाण्यासाठी पुरेसे पाणी नसल्याने नाशिकचे पाणी औरंगाबाद येथे जायकवाडी प्रकल्पासाठी सोडण्यावरून संघर्ष निर्माण झाला होता. खरीप पिक तर हातचे गेले होते. यंदा नाशिकसह धुळे, जळगाव आणि नंदुरबारमध्ये पावसाने सुरुवातीला ओढ दिली. त्यामुळे शेतकरी चिंतित होते. परंतु त्यानंतर पावसाला सुरुवात झाली. जुलै आणि आॅगस्ट महिन्याच्या महिन्यापर्यंत चांगला पाऊस झाला. त्यामुळे खरिपाची पेरणी वाढली आहेत. सध्या नाशिक विभागात ९४.८८ टक्के इतकी पेरणी झाली आहे. सुरुवातीला शेतकऱ्यांनी कापूस, उडीद, मूग, सोयाबीनची लागवड झाली होती. पावसानंतर सोयाबीन, कापूस, तूर यांची लागवड शंभर टक्क्यांवरून अधिक लागवड झाली आहे. शासनाने कडधान्य लागवडीसाठी मोठे अभियान राबविले होते. त्यातच कडधान्यांची मागणी वाढल्याने आणि कडधान्याचे दर वाढत असल्याने उत्तर महाराष्ट्रात कडधान्य लागवडीकडे यंदा कल वाढल्याचे चित्र आहे. अर्थातच अशा पिकामुळे डाळींचे उत्पन्न वाढून दर आटोक्यात राहण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)