ंंमोरोपंत पिंगळे गोसेवा पुरस्कार घोषित
By Admin | Updated: November 13, 2014 00:00 IST2014-11-13T00:00:42+5:302014-11-13T00:00:42+5:30
नाशकात वितरण : डॉ. रामस्वरूप चौहान यांना राष्ट्रीय पुरस्कार

ंंमोरोपंत पिंगळे गोसेवा पुरस्कार घोषित
नाशिक : पुणे येथील गो-विज्ञान संशोधन संस्था आणि दादरा नगर हवेली मुक्ती संग्राम समिती यांच्या वतीने अखिल भारतीय पातळीवर गोसेवक मोरोपंत पिंगळे यांच्या नावाने देण्यात येणाऱ्या गोसेवा पुरस्कारांची घोषणा संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र लुंकड यांनी नाशकात पत्रकारपरिषदेत केली. उत्तरांचलमधील पंडित गोविंद वल्लभपंत विद्यापीठातील प्रा. डॉ. रामस्वरूप चौहान यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असून, येत्या रविवारी (दि.१६) नाशकात पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.
शंकराचार्य संकुलात आयोजित पत्रपरिषदेत पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. प्रा. डॉ. चौहान यांना देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पुरस्काराचे स्वरूप ४० हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे आहे. संस्थेच्या वतीने क्षेत्रीय पुरस्कार मालेगाव येथील अखिल भारतीय कृषी गोसेवा संघाचे अध्यक्ष केसरीमल मेहता यांना घोषित करण्यात आला आहे. या पुरस्काराचे स्वरूप ३५ हजार रुपये व स्मृतिचिन्ह असे आहे, तर स्थानिक गोपालक पुरस्कार आधारवड, टाकेत येथील काशीनाथ दगडू वाघमारे, गोरक्षक पुरस्कार पिंपळगाव येथील संजय बाबूराव सोनवणे व सेंद्रिय शेतीतील योगदानाबद्दल देण्यात येणारा पुरस्कार खोडीपाडा येथील सम्राट यशवंत राऊत यांना घोषित करण्यात आला आहे. प्रत्येकी दहा हजार रुपये व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. येत्या रविवारी (दि. १६) दुपारी ३.३० वाजता गंगापूररोडवरील शंकराचार्य संकुलात होणाऱ्या समारंभात विश्व हिंदू परिषदेचे उपाध्यक्ष हुकूमचंद सावला व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महाराष्ट्र प्रांत प्रचारक प्रमुख भाऊराव पाटील यांच्या उपस्थितीत पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. संस्थेच्या वतीने २०११पासून अखिल भारतीय पातळीवर हे पुरस्कार देण्यात येत आहेत.