‘न हि वैरेन’चा ‘एनसीपीए’त प्रयोग!

By Admin | Updated: October 13, 2015 23:13 IST2015-10-13T23:10:50+5:302015-10-13T23:13:06+5:30

आज सादरीकरण : नाशिकच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

'NO WIRIEN' 'NCPA' experiments! | ‘न हि वैरेन’चा ‘एनसीपीए’त प्रयोग!

‘न हि वैरेन’चा ‘एनसीपीए’त प्रयोग!

नाशिक : गेल्या वर्षी राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रथम पारितोषिक पटकावून इतिहास रचणाऱ्या येथील लोकहितवादी मंडळाच्या ‘न हि वैरेन वैराणि’ या नाटकाने नाशिकच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. उद्या (दि. १४) या नाटकाचा प्रयोग मुंबईच्या नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्टस्मध्ये (एनसीपीए) होणार असून, यामुळे नाशिकच्या कलावंतांची मान अभिमानाने उंचावणार आहे.
लोकहितवादी मंडळाच्या वतीने सादर होणाऱ्या या नाटकाचे दिग्दर्शन मुकुंद कुलकर्णी यांनी, तर लेखन भगवान हिरे यांनी केले आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने घेतल्या गेलेल्या ५४व्या राज्य नाट्य स्पर्धेत या नाटकाने तीन लाखांचे प्रथम पारितोषिक पटकावले होते.
याशिवाय दिग्दर्शन, अभिनयासह अन्य विभागांची सतरा पारितोषिकेही या नाटकाने खिशात टाकली होती. तब्बल ७५ कलावंतांचा चमू असलेल्या या नाटकातून शांतता व अहिंसेचा संदेश प्रभावीपणे देण्यात आला होता.
या नाटकाचा प्रयोग आता ‘एनसीपीए’त होत आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने मुंबईत कोकणी, हिंदी व मराठी असा त्रिभाषा नाट्य महोत्सव सुरू असून, त्यात प्रयोग सादर करण्यासाठी लोकहितवादी मंडळाला खास निमंत्रित करण्यात आले आहे. त्यानुसार उद्या (दि. १४) सायंकाळी ६ वाजता ‘न हि वैरेन वैराणि’चा प्रयोग आयोजित करण्यात आला आहे.
दरम्यान, सन १९५० मध्ये कुसुमाग्रजांनी स्थापन केलेल्या लोकहितवादी मंडळाने गेल्या ६५ वर्षांत ४५ नाटके व १५ एकांकिकांची निर्मिती केली असून, अनेक पुरस्कारही पटकावले असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर यांनी दिली.

Web Title: 'NO WIRIEN' 'NCPA' experiments!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.