लाट चाललीच नाही...
By Admin | Updated: September 21, 2014 00:52 IST2014-09-20T20:48:07+5:302014-09-21T00:52:17+5:30
लाट चाललीच नाही...

लाट चाललीच नाही...
लोकसभा निवडणुकीत सर्व मतदारसंघांत मोदी लाट चालली. कळवण-सुरगाणा मतदारसंघात मात्र मोदी लाट चाललीच नाही. राष्ट्रवादीच्या उमेदवाराला याठिकाणी आघाडी मिळाली होती. सध्या कांद्याला भाव नसल्याने शेतकरी मोदी सरकारवर नाराज असून, त्यांची लाट विधानसभा निवडणुकीत ओसरेल, असे चित्र आता कांदा निर्यातमूल्यावरून स्पष्ट झाले आहे. कांद्याच्या लिलावाप्रसंगी भाव फुटल्यानंतर शेतकऱ्यांत नाराजीचा सूर उमटतो. शेतकरी वर्ग भाजपावर पूर्णत: नाराज असल्याने त्याचा फटका भाजपा, सेनेला बसल्याशिवाय राहणार नसल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांत उमटू लागल्या आहेत. माकपाकडून रणनीती
माजी आमदार जे. पी. गावित यांनी कळवण व सुरगाणा तालुक्यात गाठीभेटी घेण्यावर भर दिला आहे. यावेळी गावित यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगळीच रणनीती आखली आहे. कळवण शहरात संपर्ककार्यालय सुरू करून व युवावर्गाला बरोबर घेऊन क्र ांती घडवून आणण्याचा विडा त्यांनी उचलला आहे. आमदार पवार यांनी विरोधकांची मोट बांधली असून, स्थानिक प्रश्न उपस्थित करून मतदारांचे लक्ष केंद्रित करून घेतले आहे. तालुक्यात आमदार पवार यांचा जनसंपर्ककमी झाला, तर आपला जनसंपर्कवाढला असल्याचे चित्र निर्माण करण्यात गावित यशस्वी झाले आहेत. शिवाय एटींचे विरोधक असलेले डॉ. जे. डी. पवार यांचे समर्थन लाभणार असल्याने माकपाला या रणनीतीचा फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे.राष्ट्रवादी व माकपाचे बेरजेचे राजकारण
राष्ट्रवादीकडून उमेदवारीसाठी आमदार ए. टी. पवार, त्यांचे पुत्र व जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार, जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष चिंतामण गावित हे इच्छुक असून, पिता व पुत्रात रस्सीखेच आहे. माकपाकडून माजी आमदार जे. पी. गावित यांची उमेदवारी निश्चित असून, भाजपाकडून यशवंत गवळी यांच्या नावाची चर्चा घडवून आणली जात आहे. शिवसेनेकडून सुरगाणा तालुकाप्रमुख मोहन गांगुर्डे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. कळवण पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेस व कॉँग्रेसच्या सदस्यांना सभापती व उपसभापतिपदाचा मान द्यायचा, अशी भूमिका आमदार पवार व जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार यांनी घेऊन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेरजेचे राजकारण केले, तसेच सुरगाणा पंचायत समिती उपसभापतीच्या निवडणुकीत जेपी यांनीही बेरजेचे राजकारण करून सेनेच्या मोहन गांगुर्डे यांना उपसभापतिपदावर विराजमान केले असल्याने गांगुर्डे शिवसेनेचे उमेदवार होणार की नाही हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
एटी व जेपींची सत्ताकेंदे्र
कळवण तालुक्यावर व तालुक्यातील सत्ताकेंद्रांवर आमदार पवार यांचे वर्चस्व आहे; शिवाय आमदार पवार यांची स्नुषा सौ. जयश्री पवार यांनी जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या माध्यमातून कळवण तालुक्यात विकासकामे मार्गी लावून न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार व रवींद्र देवरे हे तीन सदस्य राष्ट्रवादीचे असून, पंचायत समिती व बाजार समितीवर राष्ट्रवादीची सत्ता आहे. तसेच तालुक्यातून ए. टी. पवार यांना मागील विधानसभा निवडणुकीत विरोध करणारे जिल्हा परिषद सदस्य रवींद्र देवरे व कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती धनंजय पवार व त्यांचे सर्व सहकारी येत्या विधानसभा निवडणुकीत पवार परिवारासोबत असल्याने तालुक्यातील विरोध मावळला; मात्र एटी विरोधक व वसाकाचे माजी अध्यक्ष डॉ. जे. डी. पवार हे विरोधात असून, माकपाच्या जेपींना त्यांची मदत होणार आहे. कळवण तालुक्यातील एक उमेदवार भाजपाच्या गळाला लागला असून, खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी त्यासाठी जोरदार प्रयत्न चालविले आहेत. कळवणचा शेतकरी सहकारी संघ हा भाजपाच्या अधिपत्याखाली आहे. सुरगाणा तालुक्यातील पंचायत समिती व बाजार समितीचे सत्ताकेंद्र माजी आमदार जे. पी. गावित यांच्या अधिपत्याखाली आहे, तसेच जेपींचे पुत्र सुरगाणा पंचायत समितीवर निवडूून गेले आहेत. या मतदारसंघात खासदार चव्हाण यांची भूमिका महत्त्वाची ठरणार असून, लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणूक यात बहुतांशी फरक असल्याने खासदार चव्हाण यांना अपेक्षित न्याय मतदारसंघातील जनता विधानसभा निवडणुकीत देईल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. भाजपा उमेदवाराच्या शोधात
४कळवण-सुरगाणा विधानसभा मतदारसंघाची जागा युतीच्या वाटपात शिवसेनेला गेली असून, सेनेकडून सुरगाणा तालुकाप्रमुख मोहन गांगुर्डे व राष्ट्रवादीचे एन. डी. गावित यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख कारभारी अहेर यांनी कुठल्याही परिस्थितीत कळवणची जागा शिवसेना लढविणार असल्याचा पवित्र घेतला असून, भाजपा मात्र उमेदवारांची चाचपणी करीत आहे. वरिष्ठ पातळीवर होणारे निर्णय आणि भाजपा नेत्यांची सुरु असलेली चाचपणी बघता भाजपाकडून वरिष्ठ पातळीवरून बड्या नेत्यांच्या शिफारशीवरून उमेदवार दिला जाण्याची शक्यता आहे.
कौटुंबिक संघर्ष आणि राष्ट्रवादी
४आमदार ए. टी. पवार कुटुंबीयांत कळवण-सुरगाणा विधानसभा निवडणुकीत कोणी उभे राहावे याबाबत एकमत झाले असून, घरातील विषय घरातच मिटविला आहे. आमदार पवार यांनी शेवटची निवडणूक लढविण्याची इच्छा प्रदर्शित केली आहे. ज्येष्ठ म्हणून आमदार ए. टी. पवार यांनी, तर युवक म्हणून जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. पक्ष जो निर्णय घेईल तो त्यांना मान्य राहणार आहे. कारण ज्येष्ठ असो वा युवा या दोन्ही निकषांवर उमेदवारी दिली गेली तरी ती घरातच राहील, असा यामागचा उद्देश आता लपून राहिलेला नाही. पवार कुटुंबीयांतील उमेदवारीचा तिढा सुटत नसेल, तर सुरगाणा येथील जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष चिंतामण गावित यांनी उमेदवारी करण्याची तयारी दर्शविली आहे. राज्यात आघाडी होणार की नाही आणि महायुती अभंग राहणार की भंग पावणार हे उत्तर अनुत्तरितच असले, तरी कळवण-सुरगाणा आदिवासी विधानसभा मतदारसंघातील लढत मात्र कळवण विरु द्ध सुरगाणा तालुका अशीच होणार आहे. विकास आणि परिवर्तन या मुद्द्यांवर सत्ताधारी व विरोधक यांच्यात सत्तेसाठी संघर्ष होणार आहे.
शेवटची निवडणूक लढविण्याची इच्छा प्रदर्शित करून राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आमदार ए. टी. पवार, जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार, सुरगाणा येथील जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष चिंतामण गावित यांनी उमेदवारीची मागणी केली आहे. भाजपा-सेना महायुतीत जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या नागरी सत्काराच्या निमित्ताने स्वतंत्र मेळावा घेऊन भाजपा शिवसेनेवर दबावतंत्राचा वापर करू पाहत आहे; शिवाय शिवसेनेला भाजपा विश्वासात घेत नाही हे सेनेचे दुखणे जुनेच आहे. सेनेची जागा भाजपा मागत असून, सदरची जागा प्रतिष्ठेची केली आहे. माकपाकडून मोर्चेबांधणी जोरात सुरु असून, जे.पी. अनेक दिवसांपासून तयारीला लागले आहेत. जनसंपर्कावर त्यांचा अधिक भर असून, शिवसेनेकडून उमेदवारांची चाचपणी सुरू आहे.
मागील विधानसभा निवडणुकीत कळवण तालुक्यातील राष्ट्रवादी कॉँँग्रेस व कॉँँग्रेसचे नेते आमदार ए. टी. पवार यांच्या विरोधात गेले तरी जनता मात्र बरोबर असल्याने एटींनी बाजी मारली होती. माकपाच्या जेपींचा पराभव करून लालबावटा हद्दपार केला होता. मात्र खरी लढत राष्ट्रवादी व माकपा या दोन पक्षांत न होता कळवण विरु द्ध सुरगाणा अशीच झाली होती. सुरगाण्यातील जेपी विरोधक एकवटल्याने त्यांची साथ राष्ट्रवादीच्या एटींना लाभली होती.
कळवण-सुरगाणा मतदारसंघात कळवण तालुक्याची झालेली प्रगती, विकासकामे, तर सुरगाणा तालुक्याचा अविकसित भाग, विकासकामांचा अनुशेष या प्रमुख मुद्द्यांवर निवडणूक होऊन प्रांतवाद रंगण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेला हा मतदारसंघ कळवण आणि सुरगाणा तालुका मिळून तयार झाला असल्याने आमदारकी आपल्याच तालुक्यात अबाधित राहावी यासाठी दोन्ही तालुक्यांची जनता प्रयत्नशील आहे. सुरगाणा तालुक्याकडे आमदारकी जावी यासाठी पडद्यामागून राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही नेत्यांमध्ये समेट घडू पाहत आहे. कळवण तालुक्यातूनच राष्ट्रवादीला पर्याय म्हणून उमेदवार उभा करून पवार परिवाराला अडचणीत आणण्यासाठी राजकीय खेळी खेळली जात आहे. माकपाच्या गावित यांचा मार्ग सुकर करण्याच्या वाटाघाटी सुरु झाल्याने कळवण तालुक्यातील जनता आता काय भूमिका घेणार यावरच निवडणुकीचे चित्र अवलंबून राहणार आहे.