हेल्पलाइनकडून ‘नो-रिस्पॉन्स’
By Admin | Updated: April 10, 2016 21:48 IST2016-04-10T21:35:02+5:302016-04-10T21:48:20+5:30
शिक्षणाचा हक्क : गोंधळ अद्यापही सुरूच

हेल्पलाइनकडून ‘नो-रिस्पॉन्स’
नाशिक : शिक्षण हक्क अधिकार राबविणाऱ्या यंत्रणेच्या असहकार्यामुळे असंख्य दलित विद्यार्थी या कायद्यापासून वंचित राहण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. शाळांकडून होणारी अडवणूक आणि यंत्रणेतील बिघाड हा जाणीवपूर्वक केला जात असल्याचा आरोप आता होऊ लागला आहे. दुसरीकडे हेल्पलाइनकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याच्यादेखील तक्रारी आहेत. रविवारी हेल्पलाइन क्रमांकाकडून कोणताही प्रतिसाद दिला जात नाही.
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत आॅनलाइन प्रवेशाच्या गोंधळामुळे पालकांनी कंटाळून आॅनलाइन प्रवेश घेणेच टाळले असल्याचे असंख्य उदाहरणे आहेत. शाळांकडून घालण्यात आलेली वयाची जाचक अट आणि आॅनलाइन प्रक्रियेतील गोंधळामुळे पालक मेटाकुटीला आले आहेत. आगोदर आॅनलाइनमध्ये सर्व माहिती भरूनही अर्ज सबमिट न होण्याचे प्रकार घडले. यामुळे अनेक विद्यार्थी वंचित राहिले. ज्यांचे अर्ज सबमिट झाले त्यांना ऐनवेळी तांत्रिक अडचण असल्याचे लघुसंदेश पाठवून पुन्हा एकदा अर्ज भरण्यास सांगण्यात आले, तर काहींना तुमचे स्कॅन डॉक्युमेंटच मिळाले नसल्याचे लघुसंदेश पाठविण्यात आले आहेत.
या साऱ्या प्रकारामुळे ज्यांचे अर्ज दाखल झाले अशा पालकांनादेखील पुन्हा सायबर कॅफेच्या चकरा माराव्या लागत आहेत. तांत्रिक अडचण असल्यामुळे पालकांना अगोदरच मनस्ताप सहन करावा लागला असताना अर्ज भरूनही पुन्हा हेळसांड सुरू झाली आहे. दुसऱ्यांदा अर्ज भरण्यासाठी पालकांना सायबर कॅफेवर जाऊन आॅनलाइन यंत्रणा सुरू झाली की नाही याची वाट पाहावी लागत आहे.
महापालिकेच्या शिक्षण विभागाने आॅनलाइन अर्जाची ुप्रिंट घेण्यासाठी शहरात दोन केंद्रे सुरू केली आहेत, तर तक्रार निवारणासाठी कर्मचाऱ्याची नियुक्ती केलेली आहे, परंतु या तक्रारनिवारण करणाऱ्या अधिकाऱ्याला पूर्ण माहिती नसल्याने पालकांनाच अनेक अडचणीतून मार्ग काढावा लागत आहे. (प्रतिनिधी)