मेट्रो नको, कोरोना रुग्णांवर उपचार करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 00:32 IST2020-09-06T21:35:14+5:302020-09-07T00:32:53+5:30
नाशिक : नको आम्हाला स्मार्ट बस, नको मेट्रो, आम्हाला हवे वैद्यकीय उपचार अशी आर्त मागणी करण्याची वेळ आता नाशिककरांवर आल्याची टीका राष्टÑवादी कॉँग्रेसने केली आहे. यासंदर्भात शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी आयुक्त आणि महापौर यांना निवेदन दिले आहे.

मेट्रो नको, कोरोना रुग्णांवर उपचार करा!
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : नको आम्हाला स्मार्ट बस, नको मेट्रो, आम्हाला हवे वैद्यकीय उपचार अशी आर्त मागणी करण्याची वेळ आता नाशिककरांवर आल्याची टीका राष्टÑवादी कॉँग्रेसने केली आहे. यासंदर्भात शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी आयुक्त आणि महापौर यांना निवेदन दिले आहे.
पीएम केअरमधून आलेले पंधरा व्हेंटिलेटर्स पडून आहेत, आणि दुसरीकडे कोरोना रुग्ण व्हेंटिलेटर बेडअभावी तडफडत आहेत, यापेक्षा वेगळे दुर्दैव ते काय, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
शहरात ६ एप्रिल रोजी पहिला कोरोनाबाधित आढळला. त्यानंतर ३० जूनपर्यंत शहरात दोन हजार रुग्ण होते. जुलैनंतर शहरात कोरोनाचा उद्रेक होईल हे राज्य शासनाच्या आरोग्य यंत्रणेने कळवले होते. त्यानंतर महापालिकेतील सत्ताधारी भाजप आणि प्रशासनाने कोरोनाच्या विरोधात लढण्याची तयारी करणे आवश्यक होते. बिटको रुग्णालयात पंधरा व्हेंटिलेटर्स धूळ खात पडून आहेत. त्यामुळे सत्तारुढ भाजपला कुंभकर्णी झोपेतून जागे करण्याची गरज असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
महापौरांनी यासंदर्भात अॅक्शन मोडवर येऊन नाशिककरांना दिलासा देणे गरजेचे आहे. हे सर्व केल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या अडचणींकडे लक्ष देऊन विद्युत दाहिन्यांची संख्या वाढविल्यास नागरिक सत्ताधाऱ्यांना धन्यवाद देतील, असेही निवेदनात म्हटले
आहे. आॅक्सिजन, व्हेंटिलेटर, बेडची गरजबाधित रुग्णांवर तातडीने उपचार करून रुग्णांचे प्राण वाचवणे आवश्यक होते. विशेषत: गंभीर रुग्णांना आॅक्सिजन व व्हेंटिलेटर बेडची व्यवस्था करणे आवश्यक होते, प्रत्यक्षात तसे झाले नाही. असे राष्ट्रवादीने निवेदनात म्हटले असून, महापालिकेच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली आहे. याप्रश्नी तातडीने लक्ष घालण्याची मागणी करण्यात आली आहे.