प्रदूषणाला नाही तोटा
By Admin | Updated: October 11, 2015 21:45 IST2015-10-11T21:44:38+5:302015-10-11T21:45:10+5:30
प्रदूषणाला नाही तोटा

प्रदूषणाला नाही तोटा
नाशिक : गोदापात्राचे प्रदूषण होऊ नये म्हणून प्रशासनाकडून अनेकविध उपाययोजना केल्या जातात. त्यासाठी यंत्रणादेखील कार्यरत आहे, परंतु पूर्वीपासूनच नदीपात्रात कपडे धुण्यासाठी येणाऱ्या स्थानिकांचा प्रश्न सोडविण्याबाबत प्रशासनाकडून ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही.
गोदावरी नदी ही शहरातून वाहते. त्यामुळे नदीच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात वसलेल्या परिसरातील महिला कपडे धुण्यासाठी नदीवर येतात. त्यामुळेच बंदी आणि मनाईचे कितीही नियम करण्यात आले असले तरी स्थानिकांनी जायचे कुठे असाही प्रश्न असल्याने यावर अद्याप ठोस तोडगा निघालेला नाही.
दसरा आणि दिवाळीच्या काळात तर नदीकाठावर कपडे आणि गाड्या धुणाऱ्यांची संख्या काही पटीने वाटते. या काळात पात्राचे प्रदूषण होतच असते. मात्र सणासुदीच्या काळात अशी गर्दी ही वाढतच असते.
स्थानिकांना नदीपात्रावर येण्यापासून रोखणे तसे शक्य होणार नाही ही बाब प्रशासनालाही मान्य असल्यानेच कदाचित कपडे धुणाऱ्यांवरील कारवाई होणे शक्य होत नाही. नदीवर येण्यापासून स्थानिकांना रोखणे शक्य नसल्याने प्रदूषणाला काहीप्रमाणात आमंत्रण मिळणार आहे. हे खरे असले तरी नियम कितीही केले तरी कपडे आणि गाड्या धुण्यापासून कितीजणांना रोखणार असाही प्रश्न प्रलंबित राहतो. सणासुदीच्या दिवसात नदीवर अशा प्रकारे गर्दी नेहमीच होत असली तरी यंदा मात्र गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. घाटांची निर्मिती झाल्यानेही कपडे धुणाऱ्यांची गर्दी वाढतच आहे. (प्रतिनिधी)