जिल्ह्यात सहा पुलांवरून अवजड वाहनांना ‘नो एण्ट्री’
By Admin | Updated: June 13, 2017 01:05 IST2017-06-13T01:05:12+5:302017-06-13T01:05:41+5:30
खबरदारी : दारणा, गोदावरी नदीवरील पुलांचा समावेश
_ns.jpg)
जिल्ह्यात सहा पुलांवरून अवजड वाहनांना ‘नो एण्ट्री’
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : पावसाळ्याचे चार महिने जिल्ह्णातील धोकादायक झालेल्या पुलांवरून अवजड वाहतुकीला बंदी घालण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती कक्षाला लेखी पत्राद्वारे दिली आहे. पावसाळ्यामध्ये कुठल्याही प्रकारची दुर्घटना घडू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून अवजड वाहतूक बंद करण्यात आल्याचे जाहीर केले आहे.
जिल्ह्णातील निफाड, सिन्नर, इगतपुरी, सुरगाणा, नांदगाव तालुक्यांतील गोदावरी, दारणा, पांझण तसेच गाव नाल्यांवरील एकूण सहा पुलांवरून अवजड वाहतूक रोखण्यात आल्याचे पत्रात म्हटले आहे. निफाड तालुक्यातील गोदावरी नदीवरील चांदोरी ते सायखेडा गावास जोडणाऱ्या रस्त्यावरील पूल, दारणा नदीवरील पांढुर्ली-भगूर रस्त्यावरील पूल, इगतपुरी तालुक्यातील दारणा नदीवरील घोटी गावाजवळील घोटी-सिन्नर राज्य मार्गावरील पूल, सौंदाणे-कळवण ते सुरगाणा राज्यमार्गावरील पूल, साक्री-कळवण राज्यमार्गावरील मनमाडजवळील नांदगाव तालुक्यातील पांझण नदीवरील पूल अशा एकूण सहा पुलांचा समावेश आहे.
वरील सर्व पूल धोकादायक स्थितीत असून, या पुलांवरून अवजड वाहने बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. १ जूनपासून या पुलांवरून अवजड वाहतूक थांबविण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयाला पत्राद्वारे कळविले आहे; मात्र अद्याप घोटी-सिन्नर रस्त्यावरील पुलावरून तसेच सायखेडा रस्त्यावरील पुलासह अन्य पुलांवरूनदेखील अवजड वाहतूक सर्रासपणे सुरूच आहे. शहरासह जिल्ह्णात पावसाला सुरुवात झाली आहे. इगतपुरी, नांदगाव, सिन्नर तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस होत असूनदेखील केवळ कागदावरच पुलांवरून अवजड वाहतूक बंद आहे; मात्र प्रत्यक्षात अवजड वाहतूक या धोकादायक पुलांवरून ‘जैसे थे’ सुरूच असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.बांधकाम राज्यमंत्र्याच्या आदेशाकडे दुर्लक्ष
च्निफाड तालुक्यातील सायखेडा गावाला जोडणाऱ्या गोदावरी नदीवरील पुलाची गेल्या वर्षी पावसाळ्यात आलेल्या पुरामुळे दुरवस्था झाली होती. यामुळे सदर पूल धोकादायक बनला आहे. या पुलाची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी असे आदेश फेब्रुवारी महिन्यात सार्वजनिक बांधकाम भवनामध्ये झालेल्या आढावा बैठकीत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले होते; मात्र अद्याप पुलाच्या दुरुस्तीच्या कामाला प्रशासनाला मुहूर्त मिळाला नसून लेखी पत्र काढून सार्वजनिक बांधकाम विभागाने अवजड वाहतूक बंद केल्याचेही जाहीर केले आहे. याबाबत कुठलाही सूचना फलक पुलाच्या प्रारंभी लावण्याची तसदी अद्याप घेण्यात आली नसून अवजड वाहतूकही सुरूच आहे.