सडक्या कांद्याला बाजार समितीत नो एंट्री
By Admin | Updated: August 26, 2016 01:01 IST2016-08-26T01:01:02+5:302016-08-26T01:01:16+5:30
सडक्या कांद्याला बाजार समितीत नो एंट्री

सडक्या कांद्याला बाजार समितीत नो एंट्री
सरकारवर दबावासाठी पाच पैसे दर : जाणकारांचे मतनाशिक : खाण्याजोगा नसलेला व फेकून देण्याच्याच योग्य असलेला कांदा बाजार समितीत विक्रीस आणणारा शेतकरी व अशा कांद्याचा पाच रुपये क्विंटल दराने लिलाव घेणाऱ्या व्यापाऱ्यामुळे बाजार समिती व शासन अशा दोहोंच्या बाबतीत नकारात्मक संदेश जात असल्याने शेतकऱ्यांनी आणलेल्या सडक्या कांद्याच्या लिलावात व्यापाऱ्यांनी सहभागी न होण्याचा तसेच शेतकऱ्यांनीही अशा कांद्याला बाजार समितीत न आणण्याचा निर्णय सायखेडा बाजार समितीने घेतला आहे.
दोन दिवसांपूर्वी सायखेडा बाजार समितीत लिलाव झालेला कांदा सडका व खराब होता. त्यामुळे त्याला त्याच्या योग्य भाव देण्यात आला, त्याचवेळी अन्य शेतकऱ्यांच्या कांद्याला सातशे ते आठशे रुपये इतका भाव देण्यात आला, परंतु माध्यमांमध्ये पाच पैसे किलोने कांद्याला भाव मिळाल्याचे वृत्त सर्वत्र प्रसारित
झाल्याने त्याचा परिणाम कांद्याच्या आवकेवर झाला.त्याचबरोबर कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्येही नकारात्मक संदेश गेल्याने ते व्यापारी व कांदा उत्पादक शेतकरी अशा दोन्ही घटकांसाठी मारक असल्याची भावना सायखेडा बाजार समितीच्या संचालकांनी व्यक्त केली. त्याचाच आधार घेत, यापुढे सडक्या कांद्याला बाजार समितीत येऊ न देण्याचा निर्णय घेण्यात आला. सदरचा प्रकार म्हणजे कांद्याच्या विषयावर राजकारण तापविण्याचाच भाग असल्याचा अर्थ त्यातून काढण्यात येत असून, या घटनेनंतर तातडीने राज्य सरकारने पणन सचिवांना कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कशाप्रकारे मदत करता येईल याबाबत माहिती सादर करण्याची सूचना केली तर सरकारमध्ये सहभागी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दोन हजार रुपये हमी भाव देण्याची मागणी केली. राष्ट्रवादी कॉँग्रेसने आंदोलन करून अडीच हजार रुपयांची मागणी केली असून, शिवसेना नेते व ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन दीड हजार रुपये दराची मागणी केली. या साऱ्या बाबी शेतकऱ्यांच्या पथ्थ्यावर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, शासनावर दबाव वाढविण्यासाठीच सडका कांद्याला बाजार समितीत आणले गेले व व्यापाऱ्यांनीही त्याचा लिलाव घेतल्याचे बोलले जात आहे. ज्या शेतकऱ्याच्या कांद्याला पाच पैसे भाव मिळाला, तो कांदा फेकून देण्यायोग्यच होता, एरव्ही सडलेला कांदादेखील खत म्हणून वापरला जातो व त्याला दीडशे ते दोनशे रुपये दर मिळतो, असेही जाणकारांनी सांगितले.