अभय योजनेचा पालिकेला ‘नो इफेक्ट’
By Admin | Updated: April 24, 2015 00:01 IST2015-04-23T23:59:19+5:302015-04-24T00:01:11+5:30
एलबीटी : २३ दिवसांत ५० कोटींची वसुली

अभय योजनेचा पालिकेला ‘नो इफेक्ट’
नाशिक : एलबीटी न भरणाऱ्या करबुडव्या व्यापाऱ्यांसाठी राज्य सरकारने दंड व व्याज माफीची अभय योजना लागू करण्याची घोषणा केली असली आणि अद्याप त्याची अंमलबजावणी सुरू झाली नसली तरी या घोषणेचा कोणताही परिणाम नाशिक मनपाच्या एलबीटी वसुलीवर झाला नाही. २३ दिवसांत मनपाच्या खजिन्यात सुमारे ५० कोटी रुपये जमा झाले आहेत. महिनाभरात सरचार्जसह वसुली ६२ कोटींपर्यंत जाण्याचा अंदाज उपआयुक्त हरिभाऊ फडोळ यांनी वर्तविला आहे.
राज्य सरकारने एलबीटी रद्द करण्याची घोषणा केली आहे. तत्पूर्वी एलबीटीचा भरणा न करणाऱ्या व्यापाऱ्यांनी मूळ रक्कम अदा करावी, त्यांना दंड व व्याज माफ केले जाईल, अशी अभय योजना सरकारने घोषित केली आहे. त्याचा राज्यातील मनपांच्या वसुलीवर परिणाम होत आहे. मात्र, नाशिक मनपात या योजनेच्या घोषणेचा कोणताही परिणाम जाणवलेला नाही. २३ दिवसांत एलबीटीच्या माध्यमातून तब्बल ५० कोटी रुपये जमा झाले आहेत. एक टक्का सरचार्जची सुमारे पाच कोटी रुपये धरून महिनाअखेर वसुली ६० ते ६२ कोटी रुपयांपर्यंत जाण्याची चिन्हे आहेत.